कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) च्या निवडणुकीत मतदार यादी ठरण्यापूर्वीच रंगत वाढली आहे. संस्था पात्र अपात्रेवरून कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. तब्बल 427 संस्थांना मतदानास अपात्र ठरविल्याने या संस्था काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहनिबंधक (दुग्ध) कार्यालयात धाव घेऊन संस्था अपात्र का आणि कशी झाली, याची विचारणा करीत आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात अनन्य महत्त्व असणाऱ्या जिल्ह्यात धवलक्रांती घडविणाऱ्या गोकुळ दूध संघावर वर्चस्वाचे राजकारण सुरू झाले आहे. पूर्वी आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून संघावर सत्ता राखली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने मंत्री मुश्रीफ यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच ते वारंवार महायुती म्हणून लढणार, जिंकणार आणि अध्यक्षही करणार, अशी भूमिका मांडत आहेत.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू झाला असला, तरी महायुती म्हणून जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेते एकीकडे आहेत, तर दुसरीकडे काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील एकाकी झुंज देत आहेत. प्रशासक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 427 संस्था मतदानासाठी अपात्र ठरविल्या आहेत. यामध्ये काँग््रेासचे आणि शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या संस्था अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यासंस्था आता काय भूमिका घेणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दूध संघास नियमानुसार दूध पोहोचविले असूनही आम्ही अपात्र का? असा संतप्त सवाल अनेक संस्थांचे प्रतिनिधी करीत आहेत. या संस्थांवरील कारवाई नियमबाह्य असल्याचे सांगत अनेक संस्था न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे या संस्था न्यायालयात गेल्यास काही संस्था पात्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.