कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ निवडणूक पार्श्वभूमीवर ग््राामीण भागात राजकीय ईर्षा पेटली आहे. संघाच्या राजकारणात कधी नव्हे ते राजकीय रंग आल्याने वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ठरावाचा मसुदा गावोगावी पोहोचल्याने आता ठरावासाठी दूध उत्पादक आणि कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार करण्यासाठी पात्र संस्थांना मसुदा पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे चार हजारांवर संस्थांना ठरावाचा मसुदा पाठविण्यात आला आहे. अद्याप सुमारे एक हजारांवर संस्थांचा निर्णय प्रलंबित आहे. न्यायालयाने अवसायानातील संस्थांना अभय दिले आहे. या संस्था पात्र ठरल्यास त्यांना मसुदा पाठवा, अशी तरतूद केली आहे. दूध संस्थांना मसुदा पाठविण्याची मुदत 1 जून रोजी संपली आहे.
दूध संस्थांकडून ठराव स्वीकारण्याची मुदत 2 जून ते 1 जुलै आहे. त्यामुळे ठराव स्वीकारण्याची कार्यालयीन प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, संबंधित दूध संस्थांनी नोटीफिकेशन काढून सभा घेऊन ठराव करण्यास कालावधी लागणार असल्याने प्रत्यक्षात 15 जूननंतर ठराव येण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. असे असले तरी गोकुळ माजी संचालकांसह आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या मर्जीतला आणि विश्वासू व्यक्तीची निवड करून ठराव त्यांच्या नावे देण्याचे नियोजन केले जात आहे.
महाविकास आघाडी नेत्यांचे महायुतीतील नाराजांवर लक्ष
स्थानिक नेत्यांसह मंत्री, खासदार, आमदार यांनी फिल्िंडग लावली आहे. आपल्या मर्जीतील आणि विश्वासातील व्यक्तीच्या नावे ठराव देण्यासाठी दूध संस्थांच्या संचालकांना निरोप जात आहेत. त्यामुळे ग््राामीण भागात गोकुळच्या राजकारणाचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बैठकीच्या उपस्थितीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू असले, तरी महायुती अभंग असल्याचे नेते सांगत आहेत. याउलट मात्र महाविकास आघाडीचे नेते महायुतीतील नाराजांवर लक्ष ठेवून असून समविचारी आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन लढत देण्याच्या तयारीत आहेत.