Devendra Fadnavis (Pudhari Photo)
कोल्हापूर

‌Gokul Election : ‘गोकुळ‌’बाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!

आधी प्रशासक, मगच ‌‘युती‌’बाबत चर्चा; भाजपच्या बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात ज्यांनी भाजप संपविण्याचा प्रयत्न केला ते ‌‘गोकुळ‌’च्या निवडणुकीत सोबत नकोत, अशी स्पष्ट भूमिका मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मांडली. मंत्री पाटील यांनी तुमच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगत गोकुळमध्ये महायुती म्हणून लढायचे की नाही, याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे उपस्थितांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, गोकुळ संचालक शौमिका महाडिक यांच्यासोबत बैठक घेतली. गोकुळ निवडणुकीसंदर्भात आत्ताच कोणाशीही चर्चा करायला नको, गोकुळवर प्रशासक येऊदे, नंतर निवडणूक जाहीर झाल्यावर घटक पक्षांसोबत चर्चा करू, अशी भूमिका आ.शिवाजी पाटील यांनी मांडली. संचालक शौमिका महाडिक यांनीही गोकुळमधील संचालकांच्या कारभारावर पाच वर्षांत जे आक्षेप घेतले आहेत, त्यावर पुढे कार्यवाही झाली पाहिजे, असे सांगितले.

मंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ, आ. कोरे यांची बैठक

रविवारी सायंकाळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांची गोकुळसंदर्भात बैठक झाल्याचे समजते. मात्र बैठकीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. गोकुळ निवडणुकीवरून सध्या महायुतीमध्येच वर्चस्ववाद सुरू झाला आहे. यामधून विशेषत: भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांनी भाजपसह घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर मुंबईमध्ये असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT