कोल्हापूर : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी २९ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीला सर्व संचालकांनी उपस्थित राहून कोरम पूर्ण करावा. सहकारात आदर्श निर्माण करायचा असेल, तर कोरमच्या तांत्रिक मुद्द्यामध्ये न अडकता लोकांनी दिलेल्या बहुमताचा आदर करावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. गोकुळचे २५ संचालक एकोप्याने संस्थेचा कारभार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच अध्यक्ष निवडीच्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीला बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी १४ संचालकांच्या उपस्थितीचा कोरम आवश्यक असल्याने त्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आ. सतेज पाटील यांनी भूमिका मांडली.
आ. पाटील म्हणाले, सहकारामध्ये आदर्श ठेवायचा असेल, तर अध्यक्ष निवडीच्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे. तांत्रिक मुद्द्यांवर न जाता लोकांनी दिलेल्या बहुमताचा विचार करावा, ही आपली विनंती आहे. निकाल लागला असून बहुमत आमचे आले आहे. लोकशाहीमध्ये एका मतानेसुद्धा माणूस जिंकू शकतो. सहकारात काम करणारे मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, माजी खा. संजय मंडलिक यांच्यासारखे नेते या गोष्टीचा विचार करतील. या घडामोडींचे परिणाम महाराष्ट्रातही दिसू शकतात. त्यामुळे २९ ऑक्टोबरच्या बैठकीत सर्व संचालक उपस्थित राहून कोरम पूर्ण करतील, याची मला खात्री आहे.
ते म्हणाले, मागील वेळी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची चर्चा होऊनही त्यांना अध्यक्षपद मिळाले नव्हते. यंदा निवडणुकीपूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा करताना त्यांचा सन्मान राखण्याची भूमिका आपण घेतली होती. अध्यक्षपदासाठी आणलेला गुलाल, हार आणि उभारलेला मांडव पुन्हा एकदा विजयाच्या जल्लोषात सजवायचा, असे आपण त्यावेळी म्हटले होते. गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या बैठकीला सर्व संचालक उपस्थित राहतील आणि अध्यक्षपदाची निवड सुरळीत पार पडेल.