कोल्हापूर : मराठमोळी नऊवारी साडी नेसून सह्याद्री पर्वताच्या कोकण कड्यावरून तब्बल 1800 फूट खोल दरीत रॅपलिंग करून स्वराज्य निर्माते शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षिका रणरागिणी ताराराणी यांचा वारसा अभिमानाने सांगणारा पराक्रम कोल्हापूरच्या लेकीने नुकताच केला आहे.
नुपूर अक्षय मठकर असे या रणरागिणीचे नाव आहे. ती कोल्हापूरची लेक तर सावंतवाडीची सून आहे. तिचे लग्नाआधीचे नाव नुपूर अनिल चोडणकर (कोल्हापूर) तर लग्नानंतरचे नाव नुपूर अक्षय मठकर (सावंतवाडी) असे आहे. नुपूर यांनी नऊवारी साडी परिधान करून हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा (सुमारे 1800 फूट खोल) येथे रॅपलिंग करत हा पराक्रम करणार्या कोकणातील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांचा हा पराक्रम केवळ साहसाचा नाही, तर परंपरा आणि धैर्य यांचा संगम दर्शवणारा आहे.
नुपूर यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने किल्ले भटकंतीला सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत अनेक किल्ले आणि अत्यंत कठीण समजले जाणारे भैरवगड, वजीर सुळका, नागफणी, अलंग-मदन-कुलंग, साल्हेर, गोरखगड, कोकणकडा, वासोटा असे सुळके यशस्वीरीत्या सर केले आहेत. पन्हाळगड ते पावनखिंड हा सुमारे 53 कि.मी.चा पदभ—मण मार्ग पाच वेळा पूर्ण केला आहे.
रायगड, पन्हाळगड, प्रतापगड, रांगणागड यांसह स्वराज्याच्या इतिहासातील अनेक किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नुसते गड फिरायचे नाहीत तर तिथला कचरा उचलून गड जितका होईल तितका स्वच्छ करायचा या उद्देशाने दर रविवारी स्वच्छता मोहीम सुरू केली. याबरोबरच थोडे धाडस म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात उंचीवर असलेला साल्हेर गड सर केला. मोरोशीचा भैरवगड हा सगळ्यात चढण्यात अवघड असा गड मानला जातो. तो नऊवारी साडी नेसून सर केला. तसेच 350 फूट रॅपिलिंग असलेला नागफणी सुळका नऊवारी साडीत पूर्ण केले. 26 जानेवारी 2025 रोजी कठीण मानला जाणारा वजीर सुळकासुद्धा नऊवारी साडीत रॅपलिंग आणि क्लायंबिंग केला. त्यांचे 35 हून अधिक गडकिल्ले बघून झाले आहेत. याशिवाय 24 दिवस चारचाकीतून प्रवास करत चारधाम यात्रा पूर्ण केली आहे. माहेर आणि सासरकडून मिळालेल्या भक्कम पाठबळामुळे त्यांचा हा साहसी प्रवास अखंड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नुपूर यांच्या या साहसाबद्दल घे भरारी, दैवज्ञ समाजसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे.
कोकण आणि गोव्यातील गडकोटांचा अभ्यास
कोकण आणि गोवा परिसरातील सुमारे 35 गडकोट, किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याशी संबंधित आहेत. या सर्व किल्ल्यांचा अभ्यास करण्याचा संकल्प नुपूर यांनी केला आहे.