कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सज्ज झाला आहे. शहरातील छोटी मोठी हॉटेल्स, ऐतिहासिक ठिकाणे, पन्हाळा, आंबा, अंबोलीसारखी निसर्गरम्य पर्यटनस्थळे या ठिकाणी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असून, नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे.
शहरातील प्रमुख हॉटेल्सवर 31 डिसेंबरनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. अनेक नामांकित हॉटेल्समध्ये भव्य पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये ‘डीजे नाईटस्’, ‘लाईव्ह म्युझिक’ आणि ‘डान्स फ्लोअर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. तरुणाईसह फॅमिली सेलिब—ेशनसाठी अनेक ठिकाणी ‘गाला डिनर’ आणि विशेष पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, आणि मांसाहारी पदार्थांच्या विविध डिशेशचा समावेश असलेल्या मेजवानीवर ताव मारण्यासाठी खवय्यांनी हॉटेल्समध्ये आधीच बुकिंग केले आहे.
पन्हाळा, जोतिबा, गगनबावडा आणि राधानगरी यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. रंकाळा तलाव परिसरातही सायंकाळच्या वेळी पर्यटकांची लगबग वाढली आहे. थंडीचा आनंद घेत निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे. नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने कोल्हापुरात नवीन वर्षाची सुरुवात श्रद्धेने आणि भक्तिभावाने करण्याची परंपरा अलीकडे रुजली आहे. 1 जानेवारी रोजी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरांच्या परिसरातही आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर आणि अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठिकठिकाणी नाकाबंदी
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नागरिकांनी जल्लोष करताना नियमांचे पालन करावे आणि शांततेत नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.