कोल्‍हापूर कचरा प्रकल्‍प  
कोल्हापूर

कोल्‍हापूर कचरा प्रकल्‍प स्‍थळावर प्रक्रिया न केलेल्‍या कचऱ्याचे डोंगर

निलेश पोतदार

कसबा बावडा : पुढारी वृत्‍तसेवा; कोल्हापूर शहराच्या हद्दीतील कचरा संकलनासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची जवळपास १७० वाहने कार्यरत आहेत. कचरा संकलनात महानगरपालिकेला अव्वल गुण देता येतील, पण प्रक्रिया करण्यात कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणा कुचकामी ठरत आहे. प्रकल्प स्थळावर येणारा कचरा आणि आणि प्रक्रिया होणारा कचरा यामध्ये मोठी तफावत आहे. परिणामी प्रकल्प स्थळावर पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे. प्रकल्प स्थळी बघेल तिकडे कचऱ्याचे डोंगर दिसत आहेत. यामध्ये प्रक्रिया न केलेल्या कचऱ्याचे प्रमाण प्रचंड आहे.

लाईन बाजार येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पालगत कोल्हापूर ग्रीन एनर्जी ही कंपनी कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवत होती. त्यांनी काम अर्धवट सोडल्यानंतर गेल्यावर्षीपासून प्रकल्प बायो रिस्टोअर या पुणे स्थित कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला. त्याचीही मुदत संपल्याने मुदतवाढ देत रडतखडत प्रक्रिया सुरु आहे. मोडकळीला आलेल्या प्रकल्पाच्या दुरुस्तीबद्दल आरोग्य विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, पण वरिष्ठ अधिकारी या प्रस्तावांना प्रतिसाद देत नाहीत.

सध्या प्रकल्पस्थळी येणाऱ्या कचऱ्यातील एकुण २०० मे. टन कचऱ्यापैकी १६० मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यातील सुमारे ५० मे. टन हा ओला कचरा आहे, पण प्रकल्पस्थळाची परिस्थिती पाहता कचऱ्यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

प्रकल्पस्थळी नव्या शेड उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी नवा प्रकल्प सुरू होईलही पण व्यवस्थापनातील अनागोंदीमुळे हाही प्रकल्प काही वर्षात मोडकळीस येईल. प्रकल्प नीट चालूच नये यासाठी काही यंत्रणा सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. मुख्य आरोग्य निरीक्षकांचा कार्यभार ज्यांच्याकडे आहे त्यांना याबाबतची पूर्ण माहिती नाही.

कचरा प्रक्रिया प्रकल्पावर शहराच्या विविध भागातून दररोज सुमारे १७० टिप्पर वाहनातून कचरा येतो. याशिवाय काही डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली कचरा संकलन करतात. प्रकल्प स्थळावरील वजन काटा चुकीचे आकडे दाखवत आहे. कचऱ्याची अंदाजे नोंद या ठिकाणी केली जात आहे. कचरा उतरवून घेण्यासाठी वाहनांच्या रांगा प्रकल्पस्थळी दररोज लागण्याचे चित्र असते. कचरा उतरवून घेत असताना यातील खाद्यपदार्थ शोधण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा उच्छाद प्रकल्प स्थळी दिसतो.

लाईन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात कचरा येत असून, कचऱ्यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे दिसते. प्रकल्प स्थळावर बघेल तिकडे कचराच कचरा दिसतो. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. इनर्ट मटेरियलची व्यवस्था वेळीच करावी लागेल. प्रकल्पा भोवती कुत्र्यांची टोळकी फिरत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झालेला आहे.
-प्रशांत पाटील (शेतकरी)

प्रकल्प स्थळी दररोज २०० मे. टन कचरा येत असून, सुमारे १६० मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया होते.
-जयवंत पवार (मुख्य आरोग्य निरीक्षक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT