कोल्हापूर

कोल्‍हापूर : कचरा प्रक्रिया प्रकल्प ८ दिवसांपासून धुमसतोय; नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात

निलेश पोतदार

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा गेली पंधरा वर्षे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रक्रिया केल्याचा केवळ दिखावा केला जात आहे, प्रत्यक्षात कचरा साठवण्याचे काम सद्या सुरू आहे. गेले आठ – नऊ दिवस परिसरात कचरा पेटल्याने धुराचे लोट पसरत असून, मानवी वस्तीमध्ये निरंतर २४ तास धुराचा उपद्रव सुरू आहे. नागरिकांची परिस्थिती गॅसचेंबरवर बसल्‍यासारखी झाली आहे. या परिसरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. पेटत्‍या कचऱ्यातून निघणार्‍या विषारी धुरामुळे नागरिक व जनावरांना जीव गुदमरू लागला आहे.

प्रारंभी झूम या विकसक कंपनीला त्यानंतर ग्रीन एनर्जी या कंपनीला कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवण्यास देण्यात आला. चार वर्षात प्रथमच कचरा प्रकल्‍पात भरून प्रकल्‍प बंद पडला आहे. कचऱ्याचे कायमस्वरूपी नियोजन नाही. जागा करणे व कचरा टाकणे इतकाच उद्योग सध्या सुरू आहे. जुना एसटीपी स्टॅन्ड बाय ठेवण्याचा आदेश असतानाही त्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकून प्रकल्प बंद केला आहे. या ठिकाणी सांडपाण्याची तपासणी करणारी प्रयोगशाळाही बंद झाली आहे.

कचरा पेटणे हा गंभीर गुन्हा आहे. याचा अहवाल जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात याबाबत काही होत असल्याचे दिसत नाही. सार्वजनिक उपद्रवाबाबत प्रांताधिकारी यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे, परंतु या गंभीर प्रकरणी तातडीने कारवाई होताना दिसत नाही, तर कोर्टासारखे कामकाज चालवले जाते व अनेक वर्षे वाया जातात.

दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कचरा प्रक्रिया प्रकल्प, जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यावर सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक असताना तक्रार केल्यानंतर पाहणी होते. झूम ही विकसक कंपनी काम करत असताना त्यावेळी साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या नावाखाली केवळ चाळण बसवण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने अलीकडच्या काही वर्षात जुन्या कचऱ्याच्या डोंगरावरच नवीन कचरा टाकला आहे आणि हाच कचरा गेले आठ दिवस पेटत आहे.

परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांना घशाच्या त्रासाबरोबर अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात ज्या शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे आहेत, त्या जणावरांच्या दूध देण्यावरही कचरा प्रकल्पातील प्रदूषणाचा परिणाम झाला असून अनेक दुधाळ जनावरे कमी दूध देऊ लागली आहेत. सुरुवातीला लँडफिल्ड साईट म्हणजेच भूभरण केंद्र अशा पद्धतीने प्रकल्पाला सुरुवात झाली आणि अख्या शहरातील शेकडो मे. टन कचरा या परिसरात येऊन पडू लागला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकांपासून ते आरोग्य निरीक्षकांपर्यंत याचे गांभीर्य कोणालाही दिसत नाही. कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात ३ लाख ६४ हजार घनमीटर कचरा आहे, असे मुख्य आरोग्य निरीक्षक सांगत आहेत पण प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त कचरा या ठिकाणी डम्प केला आहे.

सन २००० मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लाइन बाजार सांडपाणी प्रकल्पा जवळील जागा आरक्षित करून कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू केले. सुरुवातीला लँडफिल साईट म्हणूनच याचा उल्लेख केला गेला. या ठिकाणी शहरातील कचरा आणून टाकणार हे माहीत झाल्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध होता. पुढे झुम या खासगी कंपनीने प्रकल्प चालविण्यासाठी घेतला. प्रकल्प आवाक्याबाहेरचा आहे हे लक्षात आल्यानंतर झूम कंपनीने प्रकल्प बंद करून रात्रीत पलायन केले. नागरी आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रकल्पाविरोधात हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत नियमांचे पालन न केल्यामुळे प्रकल्पातील साहित्य जप्त करण्याचे आदेश लवादाने दिले होते, त्यानुसार कारवाईही झाली.

सतत पेटणार्‍या कचऱ्यावर नियंत्रण आनण्यासाठी महापालिकेने स्वतः प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण तो अल्पजीवी ठरला. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापुर ग्रीन एनर्जी या मुंबई स्थित नव्या कंपनीला २०१४ मध्ये ठेका देण्यात आला. प्रत्यक्षात काम २०१७ च्या अखेरीस सुरू झाले. नव्या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे, पण ते पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही असे चित्र आहे.

"कचऱ्यातील विषारी घटक आणि सध्या कचरा पेटल्यामुळे परिसरात पसरलेल्या धुराने नागरी आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे, सर्दी, खोकला, अस्थमा, घश्याचे विकार याने अनेक नागरिक त्रस्त आहेत. महापालिका संपूर्ण शहरातील कचरा आणून या ठिकाणी टाकते. हा प्रकल्प महानगरपालिकेच्या प्रक्रिया करण्याच्या आवाक्या बाहेर गेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने चारही विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत वेगवेगळे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावेत.

अॅड. निकिता देवार्डे. (देवार्डे मळा, कसबा बावडा- भोसलेवाडी रोड)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT