कोल्हापूर

Kolhapur Ganeshotsav : शाहूपुरी, राजारामपुरीत देखावे पाहण्यासाठी गर्दीचा ओघ

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तांत्रिक व मंदिर प्रतिकृतीच्या देखाव्यांची मेजवानी असलेल्या शाहूपुरीत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. शाहूपुरी आणि परिसरातील प्रत्येक तरुण मंडळाच्या देखाव्यासमोर रांगा लागल्या होत्या. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनानंतर या भागातील बहुतांश देखावे पाहण्यासाठी खुले झाले आहेत. त्यामुळे या परिसरात सायंकाळी सात वाजल्यापासून नागरिकांची वर्दळ सुरू होती. व्हिनस कॉर्नर मित्र मंडळाने साकारलेल्या बाल हनुमान लीला हा तांत्रिक देखाव्याचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, आ. जयश्री जाधव, शिवसेना ठाकरे जिल्हा प्रमुख संजय पवार, डॉ. संजय पाटील, सुनील मोदी, शशिकांत बिडकर सोमेश चौगले, अनिकेत ताडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पी. कुमार यांचा गीत संगीताचा कार्यक्रम झाला. या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळाने साकारलेल्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली. याबरोबरच शाहूपुरी पहिल्या गल्लीत गणेश मंडळातर्फे अमरनाथ दर्शन देखावा साकारला असून यासाठी विशेष गुहा तयार केली आहे. हा देखावा पाहण्यासाठी रांग लागली होती, तर शाहूपुरी युवक मंडाळाने चांद्रयान मोहीम हा तांत्रिक देखावा साकारला आहे. हा तांत्रिक देखावा रविवारी पाहण्यासाठी खुला झाला असून नागरिकांची गर्दी होत आहे. शाहूपुरीतील शिवतेज मंडळाने साकारलेली गुहा लक्षवेधी ठरली आहे.

गणेश तरुण मंडळ यंदा क्रांती विरांगना या विषयावर सजीव देखावा साकारला आहे. हा सजीव देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. शिवनेरी मित्र मंडळाचे डिस्ने वर्ल्ड बालचमूंसाठी आकर्षण ठरले आहे. याबरोबरच विविध तरुण मंडळांच्या आकर्षक मूर्ती लक्षवेधी आहेत. पूल गल्ली तालीम मंडळाची आकर्षक मूर्ती पाहण्यास गर्दी होत आहे. अष्टसिद्धी प्रणित होलार समाज मित्र मंडळाने वराह अवतार रूपातील मूर्ती आणि कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची आकर्षक सजावटीसह लक्षवेधी मूर्ती आकर्षण ठरत आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजारामपुरी मुख्य रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून ये-जा करण्याचे दोन स्वतंत्र मार्ग तयार केले आहेत. पार्किंगची व्यवस्था राजारामरोडवर दुतर्फा केली आहे. तसेच राजारामपुरी पहिली गल्ली जनता बझार चौक आणि मारुती मंदिर मार्गावरील सर्व वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवली आहे. रात्री आठपासूनच देखावे पाहायला सुरुवात झाली. दहा वाजता पोलिसांकडून देखावे बंद करायला भाग पाडले जात होते. राजारामपुरीतील सर्व गल्लीमध्ये प्रत्येक मंडळाने स्वागत कमानी आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ठिकठिकाणी खाऊच्या हातगाड्या, स्टॉल्स उभे आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळण्याची दुकानेही सजली आहेत.

राजारामपुरीतील देखावे रात्री दहाला बंद केल्याने मंडळांतून नाराजी : आज पोलिस ठाण्यात बैठक

राजारामपुरी येथील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे रविवारी रात्री दहा वाजताच पोलिसांनी सक्तीने बंद केले. त्यामुळे तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांतून तीव— नाराजी व्यक्त केली जात होती. यापूर्वी पोलिस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या बैठकीत रात्री बारापर्यंत देखावे सुरु ठेवण्यास परवानगी देण्यत आली होती. मात्र प्रत्यक्षात रात्री दहापासून देखावे बंद करण्यासाठी पोलिसांकडून मंडळांना भाग पाडले जात होते. यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, देखावे सुरु ठेवण्याबाबत सोमवारी
(दि. 25) सकाळी 10 वाजता राजारामपुरीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांची राजारामपुरी पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केल्याचे संयुक्त राजारामपुरीच्या वतीने सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT