कोल्हापूर : गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुकीला एकाच दिवशी परवानगी देण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून नियमाचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. मात्र शहरातील सार्वजनिक तरुण मंडळांनी या नियमाला कडाडून विरोध केला आहे. पोलिस प्रशासन आगमन १४ सप्टेंबर आणि विसर्जन २५ सप्टेंबर या दिवशीच परवानगी देणार, असे म्हणत असले तरी मंडळेही परंपरेनुसारच आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यावर ठाम आहेत. याप्रश्नी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार असून याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पोलिस प्रशासनाने गणेश आगमन मिरवणुकांना १४ सप्टेंबर तर विसर्जन मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त आगमन व विसर्जन मिरवणुकांना पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे गणेशोत्सवापूर्वीच सार्वजनिक मंडळे आणि प्रशासनामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
पोलिस प्रशासनाने मंडळांना विचारात न घेता एकतर्फी हा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. अनेक मंडळे आगमनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आगमन मिरवणुकांचे आयोजन करतात. लाईट, साऊंड, पारंपरिक वाद्य, देखावे यांच्यावर लाखो रुपये खर्च करतात. याचे बुकिंग दोन महिन्यापूर्वीच केलेले असते. यामुळे या निर्णयाची सक्ती नको, अशी भूमिका सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतली आहे. दरम्यान काही मंडळांनी याचे समर्थन करत पोलिसांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र शहरातील बड्या मंडळांनी या निर्णयास विरोध केल्यामुळे या मुद्द्यावरूनच प्रशासन आणि मंडळामध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.
पोलिस प्रशासनाने मंडळांना विचारात न घेता हा निर्णय घेतला आहे. मंडळांसोबत बैठक घेऊन चर्चा झाली असती तर काही मंडळांनी हा प्रस्ताव मान्य करून प्रशासनास सहकार्य केले असते. मात्र आता सर्व मंडळांनी वाद्ये, देखाव्यांचे बुकिंग केले आहे. त्यामुळे आता बदल करणे शक्य नाही.गजानन यादव, कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव समिती