कोल्हापूर : एआय व थ्रीडी प्रिंटिंगद्वारे मूर्ती साकारताना आर्टिस्ट. 2) साकारलेल्या विविध मूर्ती. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूरच्या गणेशमूर्तींना आता ‘एआय’चे कोंदण

कृत्रिम बुद्धिमत्ता व थ्रीडी प्रिंटिंगद्वारे साकारल्या जातायत विविध मूर्ती

पुढारी वृत्तसेवा

आशीष शिंदे

कोल्हापूर : सुबक, आकर्षक आणि देखण्या गणेशमूर्तींसाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचेही आकर्षण ठरलेल्या कोल्हापूरच्या गणेशमूर्तींना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा टच मिळाला आहे. मूळ मूर्तीच्या हुबेहूब कोणत्याही आकारातील प्रतिकृती करण्यासाठी एआयची मदत घेतली जात आहे. उद्यमशील कोल्हापूरच्या कलावंत मनांनी एआयच्या माध्यमातून गणेशमूर्ती घडविण्याचा नवा आविष्कार घडविला आहे. यंदाच्या गणेश उत्सवाचे ते आकर्षण असेल.

लाडक्या गणरायाच्या आगमनाला काही दिवसच उरले असल्याने कुंभार गल्ल्या देखण्या आकर्षक मूर्तींनी सजल्या आहेत. या पारंपरिक उत्सवाला कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरेख जोड मिळली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि थ्रीडी प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्हापुरात पहिल्यांदाच अशा प्रकारे गणेशमूर्ती साकारण्यात येत आहेत. सध्या अनेक मंडळांच्या मूर्तींची छोटी रूपे घरगुती पूजेसाठी बनवली जात आहेत. 21 फूट उंच मूर्तीचे छोट्या आवृत्तीत रूपांतर करतानाही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. यामुळे भक्तांना त्यांच्या आवडत्या मंडळांच्या मूर्ती घरी नेता येत आहेत. मूर्तिकार अतुल आरेकर आणि इंजिनिअर बाळकृष्ण लिमये यांनी पारंपरिक मूर्ती कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, पहिल्यांदाच थ्रीडी प्रिंटिंगच्या आधारे गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. या थ्रीडी मॉडेल्सचा उपयोग करून शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती सहज साकारता येतात. या नव्या तंत्रज्ञानामुळे अचूकता वाढली असून वेळेची बचतही होते. पारंपरिक शिल्पकलेचा आत्मा टिकवून ठेवत, मूर्ती निर्माण प्रक्रियेत आता डिजिटल युगाचा ठसा उमटू लागला आहे.

मूर्ती घडविताना असा होतो एआयचा वापर

गणेशमूर्ती घडविताना तिचा साचा अत्यंत महत्त्वाचा असतो. तो साचा आणि मूर्तीचे थ्रीडी मॉडेल बनविण्यासाठी लागणारे अचूक मोजमाप (डायमेन्शन्स) तयार करण्यासाठी विशेष स्कॅनर्स आणि एआय सॉफ्टवेअरचा वापर कोल्हापुरात केला जात आहे. हे स्कॅनर मूळ मूर्ती किंवा तिच्या चित्रांचे अत्यंत बारकाईने स्कॅनिंग करते. त्यानंतर एआय त्या आकृतीचे तंतोतंत मोजमाप एका सॉफ्टवेअरला देते. यानंतर हे सॉफ्टवेअर त्या मूर्तीचे किंवा आपण दिलेल्या प्रतिमेचे थ्रीडी प्रिंटिंगद्वारे हुबेहूब मॉडेल तयार करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT