कोल्हापूर : गणेशोत्सव हा नेहमीच नवे काही देणारा ठरला आहे. वर्ष कोणतेही असो; पण दरवर्षी गणेशोत्सवात काही ना काही नवे घडतच असते. हे नव्याने उभारणार्या नेतृत्वाबद्दलही आहे. म्हणूनच हा उत्सव नवे नेतृत्व घडविणारा व उभारणारा ठरला आहे. आज काळ बदलला असला, तांत्रिक बदलांसह झगमगाटात उत्सव साजरा होत असला, तरी नेतृत्वाची उभारणी नव्या काळातही होतच आहे.
पूर्वी गणेशोत्सवात रेडीमेड काही नव्हते. सगळ्या बाजू कार्यकर्त्यांना कराव्या लागत. काही मंडळे जुन्या पोथ्या पुराणातील चित्रे आणून त्यानुसार कुंभार बांधवांकडून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त राहत. त्याचवेळी मंडप, सजावट ही कामेही कार्यकर्तेच करत असत. काठ्या, बांबू , तट्टे आणण्यापासून ते मंडपाची उभारणी करण्याचे काम कार्यकर्त्यांनाच करावे लागत असे. त्याकाळी मंडपासाठी डेकोरेटर्सना ऑर्डर देण्यासारखी मंडळांची आर्थिक परिस्थितीही नव्हती व आपले काम आपणच केले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांची होती. त्यामुळे मंडपाची उभारणी झाली की कसा झालाय मांडव, असे विचारण्याची आपुलकी होती व जिव्हाळाही होता.
दिवसभराची आपापली कामे आटोपून रात्री हे काम चालायचे. त्यावेळी चहाच्या टपर्याही नव्हत्या तेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातून चहा आणावा लागत असे. मंडपाचे मोजमाप करणे, त्यानुसार खांब रोवून मंडप घालणे, सजावट करणे, सजावटीसाठी झाडपाला, फुले आणणे व सजावट करणे, ही सगळी कामे करताना कोणी तरी सांगत असे, इतरांच्या तुलनेत खर्चाचा जादाचा भार उचलत असे, सगळा उत्सव पार पडल्यानंतर घरातून जेवण करून आणायचे कामही प्रमुख कार्यकर्ता करत असे. या सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता होत असे. या सगळ्यातून त्या कार्यकर्त्याचे आपोआपच प्रमुख कार्यकर्त्यात रूपांतर होत असे व त्याच्याकडे नेतृत्व येत असे.
पूर्वी तालमींच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होत असे, तेथे ज्येष्ठ मंडळीच प्रमुख असत. तरुणांत कोणतेही पडेल ते काम करा एवढीच भूमिका होती. तेव्हा तालमीतून बाहेर पडून तरुणांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविण्याचे ठरवलेे. तेथूनच तरुण मंडळांची स्थापना झाली. काही तरी वेगळे करण्याच्या भावनेतून उत्सवाला भव्यता आणण्यासाठी वेगळे उपक्रम आखण्यात येऊ लागले. यासाठी पैशांची गरज भासू लागली तसा व्यापारी-उद्योगपती यांच्याकडे प्रायोजकत्वासाठी गार्हाणे घातले जाऊ लागले. यातूनच व्यापारी-उद्योगपतींकडे वट असलेल्या मंडळातील कार्यकर्त्याला आपोआपच वजन प्राप्त झाले आणि त्याच्याकडे नेतृत्व चालून आले. आजही तशीच परिस्थिती कायम आहे. यातून सामान्य कुटुंबातील युवक कार्यकर्ते बनले आहेत.
कोल्हापूर महापालिकेची पहिली निवडणूक 1978 साली झाली होती. त्यापूर्वी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत जे आखाड्यात उतरले, त्यापैकी बहुतेकजण त्या त्या भागातील मंडळांचे कार्यकर्ते होते. आजही तो प्रवाह सुरू आहे.