Gandhinagar Youth Found Dead
नागाव : मादळे (ता. करवीर) येथे थर्डी फर्स्ट ची मजा लुटण्यासाठी आलेल्या गांधीनगर येथील तरूणाचा मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात असून या बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव रोहित हिरालाल निरंकारी (वय ३७ रा. गांधीनगर) असे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मादळे (ता. करवीर) येथील एका फार्म हाऊसवर रोहित आपला मित्र निखिल मोहन चावला याच्यासोबत त्याने नवीन घेतलेल्या ज्युपिटर मोपेड वरून बुधवारी आला होता. यावेळी त्याने फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले होते. गांधीनगर कडे जाताना बाळासाहेब पाटील यांच्या घराजवळ रोहित पडला. त्याला उठविण्यासाठी निखिलने प्रयत्न केला. पण तो काही उठला नाही.
दरम्यान, रात्री उशिरा भजन करून मादळे येथील घरी परतणाऱ्या महिला भजनी मंडळातील महिला व पुरुषांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. पण तो काही उठला नाही. मित्र निखिल हा परत फार्म हाऊसवर जाऊन झोपला. सकाळी शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यास कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. तपास सपोनि सरवदे करीत आहेत.