गांधीनगर : येथील कचरा डेपोला अचानक आग लागल्याने धुराचे प्रचंड लोट म्हसोबा माळासह गुरुनानक कॉलनी, गोशाळा परिसर या नागरी वस्तीत पसरल्याने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना काही काळ याचा नाहक त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाने साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
गांधीनगर आणि वळिवडे येथील कचरा म्हसोबा माळ येथील कचरा डेपो मध्ये डंपिंग केला जातो. वारंवार या कचरा डेपोस आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. शुक्रवारी अचानक कचरा डेपोला आग लागल्याने धुराचे प्रचंड लोट नागरी वस्तीत पसरले. त्यामुळे लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना या धुरामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. ही घटना सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच विनोद हजुराणी, ग््राामपंचायत कर्मचारी नितीन माळी यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलास पाचारण केले.
पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच दलित महासंघाचे उपाध्यक्ष अनिल हेगडे यांच्यासह नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आल्यानंतर धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.