कोल्हापूर ः वाडीचरण (ता. पन्हाळा) येथील गायरानवरील अतिक्रमणांची चार महिन्यांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी (दि. 16) दिले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंचसमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अभिजित आडगुळे यांनी युक्तिवाद केला.
वाडीचरण गावातील नाना माळी यांनी त्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. गावातील 4.56 हेक्टर गायरान जमीन शासनाकडे हस्तांतरीत करताना त्याचा वापर शेतीसाठीच करावा, अशी अट होती. परंतु, त्यावर बेकायदेशिररीत्या बांधकामे करण्यात आली आहेत. त्याविषयी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, माळी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.
राज्य शासनाने गायरान जमिनीसंदर्भातील प्रक्रिया न राबविता ती जमीन त्रयस्त व्यक्तींना हस्तांतरीत केल्या आहेत. बेकायदेशिर बांधकामे पाडून गावाला गायरान परत करावे, अशी मागणी त्यांच्या वतीने अॅड. आडगुळे यांनी युक्तिवादात केली. राज्य शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. गायरानात बांधकामे झाल्याची कबुली त्यात देण्यात आली आहे.