कोल्हापूर : गॅसटंचाईमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. एकीकडे 45 रुपये लिटर असणारा गॅस 105 रुपयांवर गेला आहे. परंतु आता तोही गॅस पंप बंद आहे. परिणामी कोल्हापुरातील एक हजारहून अधिक रिक्षा बंद आहेत. सरनोबतवाडी येथील पंपावर रिक्षा व्यावसायिक गॅसच्या प्रतीक्षेत आहेत.
रुईकर कॉलनी चौक, कदमवाडी रोड, कळंबा तपोवन मैदान परिसर आणि सरनोबतवाडी अशा तीन ठिकाणी रिक्षांसाठी पंप आहेत. दोन दिवसांपासून कदमवाडी रोड आणि तपोवन येथील पंप बंद आहेत. सरनोबतवाडी येथे मंगळवारी 700 हून अधिक रिक्षा रांगेत होत्या. कोल्हापुरात सुमारे 22 हजार रिक्षा आहेत.
कर्नाटकमध्ये 85 रुपये लिटर मिळणारा गॅस कोल्हापुरात 105 रुपयास विक्री होत असल्याची माहिती रिक्षा संघटनेच्या नेत्यांना मिळाली. त्यामुळे सोमवारी ते पंप चालकांना जाब विचारण्यासाठी गेले. परंतु गॅस नसल्याने पंप बंद होता. त्यामुळे रिक्षा चालकांनी निदर्शने केली. शाळेतील मुलांना सोडण्याचे काम रिक्षा चालक करतात. बुधवारपासून परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु गॅसच नसल्याने बहुतांशी रिक्षा चालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडू शकत नसल्याचे पालकांना सांगितले आहे. त्यामुळे पालकांनाच आता मुलांना शाळेत सोडावे लागणार आहे.