गारगोटी : पाटगावचे माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर यांच्या बेपत्ता प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. या प्रकरणात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत असून, तपास यंत्रणाही अधिकच बुचकळ्यात पडली आहे. जंगलात आढळलेल्या जळीत राखेचे नमुने डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
महेश पिळणकर यांच्या मोटारसायकलपासून काही अंतरावर असलेल्या जंगलात जळीतची घटना आढळून आली आहे. घटनास्थळी पूर्णतः जळालेली राख सापडली असून, अस्थीही पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. भुदरगड पोलिसांनी घटनास्थळावरून राख पोत्यात भरून जप्त केली असून, ती तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे. महेश पिळणकर बेपत्ता होऊन सहा दिवस उलटले असून, त्यांच्या बेपत्ता होण्याचा आणि जंगलातील जळीत घटनेचा परस्पर संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाटगाव व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महेश पिळणकर यांचे कुटुंबीय तीव चिंतेत असून, गावात पोलिस तळ ठोकून आहेत. दरम्यान, आज एसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाचे नवे धागेदोरे हाती लागतात का, यासाठी पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
तो दात कोणाचा?....
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे जंगलातील राखेमध्ये एक दात आढळून आल्याची माहिती आहे. हा दात प्राण्याचा आहे की मानवाचा, याबाबत सध्या स्पष्टता नाही. मात्र, दाताच्या वैज्ञानिक तपासणीतून या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डीएनए अहवालाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.