कासारवाडी : जुने पारगाव (ता .हातकणंगले ) येथील गावाच्या वेशीवरून वारणा नदीच्या पुराचे पाणी शनिवारी (दि.२७) गावात शिरले. परिसरातील ग्रामपंचायत चौक, वारणा बाजार चौक परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पुराचे पाणी साचले असून नागरिकांनी जनावरांसह गरजेच्या वस्तूसह स्थलांतरास सुरूवात केली आहे. मात्र प्रशासनाने येथे कोणत्याही प्रकारचे काळजी घेतली नाही.
मागील आठ दिवसापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस चांदोली धरण क्षेत्रात सुरू आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवून १६३८५ क्युसेक केला आहे. वारणा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला होता. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावमध्ये पुराचे पाणी शनिवारी सकाळी आले नवे पारगाव व जुने पारगावला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने येथील ग्रामपंचायत चौक, वारणा बाजार चौक येथे पाणी शिरले. या परिसरातील नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
येथील परिसरात सुमारे दोन ते तीन फूट पाणी आले आहे. नागरिक याच पाण्यातून ये जा करत होते. तर काहीजण मोटरसायकलवरून स्टंट करत होते. कांही नागरिक पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करत होते. महावितरणच्या कर्मचारी व्यतिरिक्त प्रशासनाचे अधिकारी दिसले नाही. प्रशासनाने मात्र सूचना देऊन निघून गेले