पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यासह कोल्हापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापुरात पुराचे पाणी (Kolhapur Flood) शिरल्याने महापुराची धास्ती वाढली आहे. पुरसदृश्य स्थिती निर्माण होताच कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर येत जिल्ह्यात निवारा केंद्रांची सोय केली. नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु केल्या. जिल्हा प्रशासनाने पुरग्रस्तांसाठी असलेल्या निवारा केंद्रात आतापर्यंत एकुण ७०५ नागरिक दाखल झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरात पुरग्रस्तांसाठी एकूण ३२ निवारा केंद्रांची सोय केली असुन सध्या (दि.२७ पर्यंत) १२ निवारा केंद्रांमध्ये नागरिक आहेत. या १२ निवारा केंद्रात एकूण १७२ विस्थापित कुटुंबे दाखल झाली आहेत. या १७२ विस्थापित कुटुंबामधील लोकांची संख्या (दि. २३/०७/२४ पासून आज अखेर) ७०५ आहे. या ७०५ मध्ये एकूण पुरुष ३६१, स्त्रिया ३४४ आणि १२६ मुले आहेत. त्याचबरोबर जनावरांसाठी केलेल्या छावणीमध्ये ७८ जनावरे दाखल झाले आहेत.
गेल्या सात दिवसांपासून संथगतीने वाढणार्या पंचगंगेच्या महापुराचे पाणी शुक्रवारी सकाळी अखेर शहरातील (Kolhapur Flood updates) अनेक भागांत घुसले. यात प्रामुख्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहतसह अनेक भागांचा समावेश आहे. सायंकाळी जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अजूनही या भागात पाणी आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले असून, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे शहराला बसलेला महापुराचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे नागरिकांची धास्तीही वाढत चालली आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीही बिकट होत चालली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात संततधार कायम आहे. यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी (Panchganga water level) पातळीत वाढ होत आहे. आज शनिवारी दुपारी २ वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४७ फूट ५ इंच इतकी होती. तर ९८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.