शिरढोण : पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा दाब वाढून शिरढोण–नांदणी मार्गावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने शनिवारी रात्री प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. मात्र, शिरढोण व नांदणी या दोन्ही बाजूंना संरक्षक बॅरिकेड न लावल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने मजबूत बॅरिकेड उभारावेत, अशी मागणी होत आहे.
शिरढोण–नांदणी मार्ग हा जयसिंगपूर, सांगली तसेच परिसरातील गावांना जोडणारा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. पुरामुळे हा मार्ग बंद झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व नोकरदारांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असून मोठी गैरसोय होत आहे.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्गाचा अंदाज येणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंना संरक्षक बॅरिकेड किंवा इशारा फलक नसल्याने एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने बॅरिकेड, इशारा फलक व आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.