Kolhapur flood 
कोल्हापूर

Kolhapur flood: पंचगंगा ५४ फुटांवर; शिरढोण पूल पाण्याखाली, वीटभट्ट्यांमध्ये पाणी शिरले

नागरिकांकडून पूल पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासन सतर्क झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ५४ फुटांवर पोहोचल्याने यापूर्वीच शिरोळ व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले असून, रविवारी (दि.) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरढोण पुलावरूनही पाणी वाहू लागले. त्यामुळे हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

दरम्यान गेल्या वेळी आलेल्या पाण्यामुळे शिरडून पुलाला तुंबून लगतच्या शेतीत पसरलेली जलपर्णी सध्या वाढली असून ती पाण्याच्या प्रवाहाने प्रवाहीत होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. नदीपात्रात वाढलेल्या पाण्यामुळे पंचगंगेच्या पुराचे पाणी वेगाने आजूबाजूच्या सखल भागात पसरू लागले आहे. शिरढोण पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना या मार्गाचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून पूल पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस आणि महसूल प्रशासन सतर्क झाले आहे.

पंचगंगा नदीचे पाणी अनवडी नदी परिसरातील कुंभार खिंडीत पोहोचल्याने तेथील अनेक वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे वीट उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तयार विटा, कच्चा माल आणि इतर साहित्य पाण्यात बुडाल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शेतांमध्येही पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरोळ तालुक्यातील आणखी अनेक रस्ते व संपर्क मार्ग बंद होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT