Kolhapur Flood Situation
कासारवाडी : धरण क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस व धरणातून वाढवण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी व वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द पुल पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने वाहतुकीस धोका होऊ नये म्हणून बंद केला आहे.
निलेवाडी (ता. हातकणंगले) हे गाव पूरग्रस्त गाव असून नेहमी या गावाला महापुराचा फटका बसतो. यावर्षी सुरुवातीला झालेल्या पावसामुळे महापुराची परिस्थिती उद्भवते काय अशी स्थिती होती. परंतु पावसाने खंड दिल्यामुळे दिलासा मिळाला. परंतु मागील ४ दिवसांपासून धरण परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे वारणा नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.
मंगळवारी (दि.१९) दुपारी वारणा नदीवरील निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला. पाऊस व धरणातील विसर्ग असाच सुरू राहिला तर पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुशील बेलेकर, मंडलाधिकारी अमित लाड, ग्राम महसूल अधिकारी यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षता या संदर्भात मार्गदर्शन केले. पाणी पातळी वाढली तर निलेवाडीला जोडणारा चिकुर्डे पूल निलेवाडी मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नियोजित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या.