‘महादेवी’ला परत आणेपर्यंत लढा सुरूच 
कोल्हापूर

Madhuri Elephant | ‘महादेवी’ला परत आणेपर्यंत लढा सुरूच

गडहिंग्लजच्या आत्मक्लेश मोर्चात आंदोलकांची भूमिका; सर्वधर्मीय सहभागी

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज ः धार्मिक व सांस्कृतिक भावनांना ठेच पोहोचवून जाणीवपूर्वक महादेवी हत्तिणीला नांदणी मठातून वनतारामध्ये पाठविण्यात आले. महादेवी हत्तीण ही आमच्या सांस्कृतिक वारशाचा केंद्रबिंदू आहे. आमच्या भावनांवर आघात घालणार्‍यांविरोधात हा लढा असून, जोवर महादेवी हत्तीणीला मूळ नांदणी मठात आणत नाहीत, तोवर हा लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका गडहिंग्लज येथील मोर्चात आंदोलकांनी मांडली. शहरात सकल जैन समाजाबरोबरच सर्वधर्मीयांनी मंगळवारी आत्मक्लेश मोर्चा काढत तीव— आंदोलन केले.

मोर्चाची सुरुवात जैन मंदिरापासून करण्यात आली. शहरातील बाजारपेठेतून हा मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आला. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी अशोक कमते, प्रा. सुनील शिंत्रे, स्वाती कोरी, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, नागेश चौगुले, सिद्धार्थ बन्ने, संग्राम सावंत, राजेंद्र तारळे, सतीश पाटील, उदय जोशी, योगेश शहा, संतोष चिकोडे, प्रीतम कापसे, प्रा. रफिक पटेल, राजेंद्र गड्ड्याण्णावर यांनी मनोगते व्यक्त केली. महादेवी हत्तिणीसाठी सुरू असलेल्या लढाईत आम्ही गडहिंग्लज उपविभागातील सर्व कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता नांदणी मठाच्या पाठीशी ठाम असून, जोपर्यंत महादेवी हत्तिणीला नांदणी मठात आणत नाहीत, तोवर ही लढाई सुरूच ठेवू, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी बेलबाग आश्रमाचे महंत सिद्धेश्वर महास्वामी, कारिमठाचे महास्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील जैन समाजाचे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

महादेवी हत्तिणीला परत आणून दाखवू

नांदणी मठाला हजारो वर्षांची परंपरा असून, सातशे वर्षांपासून हत्तीची परंपरा आहे. धर्माच्या, संस्काराच्या व आमच्या सांस्कृतिक वारशावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असून, हत्तीची जोपासना कशी करावी, हे वनतारा किंवा पेटाने जैन समाजाला शिकविण्याची गरज नाही. जनरेटा व जनआंदोलनाच्या माध्यमातून महादेवी हत्तिणीला आम्ही परत आणून दाखवू, असे मुनिश्री विदेहसागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT