कोल्हापूर : थकीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी भागीदारासह त्याच्या मुलाचे मोटारीतून अपहरण करून मारहाण केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. शनिवारी (दि. २२) दुपारी ही घटना घडली. यामध्ये अनिल मोहिले व त्यांचा मुलगा अनिकेत (रा. रॉयल एस्टोनिया, न्यू पॅलेस परिसर) हे दोघे जखमी झाले. रमणमळा परिसरातून अपहरण करून त्यांना कराड परिसरात सोडून दिले. या प्रकरणी पवन सिकचिरा (रा. खारघर, नवी मुंबई), तुषार, आदित्य, प्रवीण (सर्व रा. मुंबई) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संशयित पवन याची पत्नी स्मिता व अनिल मोहिले यांनी २०१६ मध्ये मुंबईतील मंगलमूर्ती पतसंस्थेकडून ६० लाखांचे कर्ज घेऊन पाटण येथे काजू फॅक्टरी सुरू केली होती. यास अनिल मोहिले जामीनदार होते. काही दिवसांत काजू फॅक्टरी बुडीत गेल्याने स्मिता सिकचिरा यांच्या नावावर कर्ज थकीत राहिले. याचे हप्ते भरण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर आली. यामुळे स्मिता सिकचिरा व त्यांच्या कुटुंबाने मोहिले यांनी पतसंस्थेत येऊन कर्जात भागीदारी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी केली. यातूनच पवन सिकचिरा चौघांसोबत शनिवारी (ता. २२) कोल्हापुरात आले. त्यांनी मोहिले यांच्या घरात शिरून अनिल व अनिकेत यांना मारहाण करून जबरदस्तीने एका मोटारीत कराडपर्यंत नेले. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये नेऊन मारहाण केली. यानंतर दोघांना सोडून दिले. जखमींनी दोन दिवस उपचार घेऊन मंगळवारी रात्री याबाबतची तक्रार दिली.