सरवडे : ऊसाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३१) मांगोली (ता.राधानगरी) परिसरात घडली. दत्तात्रय ईश्वरा पाटील (वय ५२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची नोंद राधानगरी पोलिसात करण्यात आली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दत्तात्रय पाटील हे शुक्रवारी ऊसाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू होते. यादरम्यान त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. कुंटुबियांनी त्यांना बेशुद्धअवस्थेत पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद पुतणे अमोल कृष्णात पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.