Kolhapur News |
गुडाळ : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवड सोमवार दिनांक ५ मे रोजी सकाळी अकरा वाजता संघाच्या कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयात जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शेतकरी संघाच्या सत्तारूढ संचालक मंडळात महायुती, महायुती मधील घटक पक्ष आणि महाविकास आघाडीच्या संचालकांचा समावेश आहे. मावळते अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तर उपाध्यक्ष भाजपाचे होते. आघाडीच्या धोरणाप्रमाणे आता अध्यक्षपद जनसुराज्य शक्ती पक्षाकडे राहणार असल्याचे सांगण्यात येते. या पक्षाकडून बाबासाहेब शिंदे (पन्हाळा) आणि सुभाष जामदार (शाहूवाडी) यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपद आ. सतेज पाटील समर्थकाला मिळणार की आ. अमल महाडिक समर्थकाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. रविवार ४ मे रोजी दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शेतकरी संघातील सत्तारूढ आघाडीच्या सर्व नेते आणि संचालकांची बैठक मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली असून या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.