कोल्हापूर : जगप्रसिद्ध 10 नंबरची जर्सी, मेस्सीचा मुखवटा व टोप्या परिधान केलेले हजारो अबालवृद्ध फुटबॉल प्रेमी, मेस्सी ... मेस्सी ... असा अखंड जयघोष करत उत्साह आणि जल्लोषात फुटबॉल सम्राट जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सीचे मुंबईतील वानखेडे मैदानावर स्वागत करण्यात आले. यात फुटबॉलपंढरी कोल्हापूरकर सर्वात आग्रेसर होते. सुमारे एक हजार फुटबॉलप्रेमी मेस्सीला पाहण्यासाठी मुंबईला गेले होते, तर महादेवा योजनेंतर्गत निवडलेल्या तीन मुले व दोन मुलींसह प्रशिक्षकांनी मेस्सीशी संवाद साधून त्यांच्याकडून फुटबॉलच्या स्कील्सचे धडे घेतले. इतकेच नव्हे, तर दौर्याच्या नियोजनातही कोल्हापूरकरांचा सहभाग होता.
आंतराष्ट्रीय स्तरावरील महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला पाहण्यासाठी हजारो रुपये खर्चून लोक रात्रभर प्रवास करून मुंबईला गेले होते. आतापर्यंत टीव्हीवर पाहिलेल्या मेस्सीसोबत हास्तांदोलन करून त्याच्याकडून फुटबॉलची कौशल्ये शिकण्याची संधी कोल्हापुरातील फुटबॉल प्रशिक्षक व महादेवा योजनेसाठी पात्र ठरलेल्या नवोदित फुटबॉलपटूंना मिळाली. यात महाराष्ट्र हायस्कूलचा आर्यन सचिन पोवार, आराध्य नागेश चौगले, सेंट झेव्हिअर्स हायस्कूलचा रूद्र मकरंद स्वामी आणि कणेरी (ता. करवीर) येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलची दिव्या सतीश गायकवाड, साक्षी संदीप नवाळे या नवोदित फुटबॉलपटूंसह फुटबॉल प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड व निखिल कदम यांचा समावेश होता. या सर्वांनी मेस्सीशी हास्तांदोलन करून भारतीय संस्कृतीप्रमाणे पाया पडून अभिवादन केले.
क्षितीज देसाई यांचे विशेष योगदान
प्रोजेक्ट महादेवा सुरू करण्यात आणि मेस्सीचा दौरा यशस्वी करण्यात कोल्हापूरचे सुपुत्र क्षितीज देसाई यांची महत्त्वाची भूमिका होती. या प्रकल्पाचे संशोधन, सूक्ष्म नियोजन, भागधारकांमधील समन्वय, तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूरच्या क्षितीज देसाई याचे मोलाचे योगदान होते. सरकारी यंत्रणा, क्रीडा संघटना, भागीदार संस्था आणि तांत्रिक पातळीवरील टीमचे समन्वयक म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. राज्यभरातील 13 वर्षांखालील मुला-मुलींची निवड, त्यांना संघटित करणे, प्रशिक्षण, शिक्षण, पोषण आणि मार्गदर्शन देणे. तसेच, फुटबॉलला सक्षम करिअर म्हणून स्वीकारण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे व त्याची अंमलबजावणी क्षितीज देसाई यांनी केली.