कोल्हापूर ः सीपीआर येथे क्लार्क आणि शिपाईपदाच्या नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी, अधिष्ठातांच्या बोगस सहीने नियुक्ती पत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस सहीच्या आधारे नोकरी देणारे रॅकेट सक्रिय असल्याच्या संशयावरून अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, अनेक उमेदवारांना अशा प्रकारची बोगस नियुक्ती पत्रे दिल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबत माहिती अशी, नागेश कांबळे याने गायत्री वारके यांना महिन्यापूर्वी लिपिकपदाचे, तर अन्य एकाने दिलीप दावणे याला शिपाईपदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या बोगस सह्या आहेत. बोगस नियुक्ती पत्र घेऊन उमेदवार सीपीआर येथे रुजू होण्यासाठी आले. हे नियुक्ती पत्र पाहून सीपीआर प्रशासनातील अधिकारीही बुचकळ्यात पडले. मात्र, कथित नियुक्ती पत्र पाहून कार्यालयीन अधीक्षक अनुष लोखंडे, टेक्निशियन शिवाजी जाधव यांना संशय आला. त्यांनी वारके यांचे नातेवाईक यांना पत्र घेऊन अधिष्ठाता डॉ. मोरे यांची भेट घालून दिली. नियुक्ती पत्राची तपासणी केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकारामुळे सीपीआर हादरून गेले आहे. जिल्ह्यातील अनेकांना बोगस नियुक्ती पत्रे दिल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तपास गतीने करून या साखळीचा छडा लावणे गरजेचे आहे.
बोगस नियुक्ती पत्र देऊन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सीपीआर परिसरात सुरू आहे. विविध प्रकारच्या टॅक्टीस वापरून पैसा मिळविण्याचा धंदा सीपीआरमध्ये काहीजणांनी सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सीपीआर प्रशासनाने केले आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील अनेकांना अशा प्रकारची बोगस नियुक्ती पत्रे दिल्याची चर्चा आहे. याबाबत उमेदवार मित्रांना विचारून खात्री करत आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातच असे प्रकार घडत आहेत. हे धक्कादायक आहे. यावर कोणाचा अंकुश आहे की नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.