बनावट बॅंक खात्यांद्वारे कोट्यवधींचा गंडा घालण्याचा प्रयत्न; तिघे संशयित ताब्यात 
कोल्हापूर

Kolhapur Fraud : बनावट बॅंक खात्यांद्वारे कोट्यवधींचा गंडा घालण्याचा प्रयत्न; तिघे संशयित ताब्यात

शाहूपुरीतील कार्यालयावर छापा : आंतरराज्य रॅकेटचा संशय; वाहनासह कागदपत्रे हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सायबर गुन्ह्यातील रक्कम बनावट बॅंक खाती काढून कोट्यवधीपेक्षा जादा रकमा विविध बँकांमध्ये वर्ग करणाच्या प्रयत्नात असलेल्या शाहूपुरी येथील टोरकोलाईन पॉवर टूल्स प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून कोल्हापूर सायबर क्राईम सेल पथकाने शुक्रवारी तिघा आंतरराज्य सायबर संशयितांना ताब्यात घेतले. पथकाने घेतलेल्या झडतीत १४ विविध बॅंकांतील टोरकोलाईन पॉवर टूल्सच्या नावाने चेकबुक्स, १० ऑनलाईन पेमेंटचे क्यूआर कोड मशिन, दोन रेडिमेड रबरी स्टॅम्प, पासबुक, बनावट आधारकार्ड हस्तगत केली.

नितेशकुमार नवीनकुमार दहिया (वय २१, रा. रामगोपाल कॉलनी, गल्ली क्रमांक १५, रोहतक, हरियाणा), अनुप रोहितास यादव (२८, ग्रामसोरवा, पोस्ट नांगलखेडिया, ता. बेहरोड, राजस्थान), अमित धरमापाल यादव (२८, ग्रामडेरोली अहिर, मेंद्रगढ, हरियाणा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीतील स्वस्तिक प्लाझामधील पहिल्या मजल्यावर भाडे तत्त्‍वावर गाळा घेऊन संशयितांनी महिन्यापूर्वी कार्यालय थाटल्याचे उघड झाले आहे. सायबर क्राईम सेलचे निरीक्षक संजय हारूगडे याच्यासह पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

संशयितांनी टोरकोलाईन पॉवर टूल्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून करंट अकाऊंट काढून सायबर गुन्ह्यातील कोट्यवधीच्या रकमा बनावट खाती काढून वर्ग करण्याची तयारी सुरू केली होती.

करमवीर ऊर्फ विजेंद्रसिंह (रा. पलवली, बगेगा भवनापुरा, राजस्थान) याच्यासमवेत ताब्यात घेतलेल्या संशयितांनी भारत सरकारच्या उद्यम रजिस्ट्रेशनवर नोंदणी करून बनावट शेल कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या नावे कोल्हापूर परिसरातील विविध बँकांमध्ये करंट अकाऊंट काढण्यात आली. त्यात सायबर गुन्ह्यातील रकमा ज्या पटीत जमा होतील, त्या पटीत टक्केवारीमध्ये हिस्सा वाटून घेत होते. करंट बँक अकाऊंट रक्कम विजेंद्रसिंह भरत होता. दि. १ जुलै २०२६ पासून संशयितांनी कोल्हापुरात कंपनीची स्थापना केल्याचेही चौकशीत उघड झाल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT