कोल्हापूर : गोव्यात निर्मिती झालेल्या दारूच्या बाटल्यांवर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर डिस्टलरीचे लेबल लावून बनावट देशी दारूची तस्करी करणार्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने सोमवारी पर्दाफाश केला. देवगड-निपाणी महामार्गावर आणूर रोड, बस्तवडे (ता. कागल) येथे सापळा रचून 40 लाख रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. पथकाने परप्रांतीय तस्करांसह दोघांना अटक केली आहे.
सलिम खय्युम शेख (वय 35, रा. दसनापूर, आदिलाबाद, तेलंगणा, सद्या, रा. यवतमाळ), सुरज तेजराव सावंग (रा. सिंगानियानगर, यवतमाळ) अशी संशयितांची नावे आहेत. तस्कराकडून बनावट देशी संत्रा दारूसाठ्यासह ट्रक असा 61 लाख 15 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नेरकर, उप अधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले.
गोव्यातून बनावट देशी दारूचा साठा नागपूरकडे रवाना होत असताना ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बनावट संत्रा दारूमधील आंतरराज्य रॅकेटमधील सूत्रधारासह साथीदारांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. निरीक्षक शंकर आंबेरकर, प्रमोद खरात, ए. आर, नायकुडे, पी. व्ही. नागरगोजे, डी. बी. गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.