Kolhapur: Excavation of Kasarwadi hills, houses cracked due to blast
कासारवाडीत वन विभागाच्या हद्दीपर्यंत पोखरला डोंगर File Photo
कोल्हापूर

कोल्‍हापूर : कासारवाडी डोंगराला उत्खननाची कीड, सुरुंग स्फोटामुळे घरांना भेगा

पुढारी वृत्तसेवा

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीच्या हद्दीत डोंगराचे मोठ्या प्रमाणात उत्‍खनन केले जात आहे. उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या मोठ्या क्षमतेच्या स्फोटामुळे हादरे बसून घरांच्या भिंतींना भेगा पडू लागल्‍या आहेत. वन विभागाच्या हद्दीपर्यंत डोंगर पोखरल्‍याने आता वन्य प्राण्यांसाठीही धोका निर्माण झाला आहे.

खाणींच्या स्फोटामुळे घरांना भेगा

गावाच्या आजुबाजूला दगड खाणी आहेत. उत्खननासाठी ड्रील मशीनचा वापर सुरू असतो. दगड खाणीमधून बेसुमार दगड उत्खनन केले जाते. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच शिवाय वायू आणि ध्वनी प्रदूषणही निर्माण होत आहे. दगड खाणींच्या स्फोटामुळे काही घरांना भेगा पडल्‍या आहेत. लागून असलेल्या वन विभागाच्या जंगलातून स्फोटांच्या भयानक आवाजामुळे वन्य प्राणी शेताकडे व गावाच्या दिशेने घुसखोरी करतात.

वनविभागाच्या हद्दीला लागून उत्खनन

यामुळे प्राण्यांची अन्नसाखळी बिघडत चालली आहे. वनविभागाच्या हद्दीला लागून उत्खनन केले जात आहे. कासारवाडी ग्रामस्थांनी डोंगराचे उत्खनन थांबवावे यासाठी डोंगर वन विभागाकडे वर्ग केला, पण पुन्हा डोंगराला उत्‍खननाची कीड लागल्याने ग्रामस्‍थातून संताप व्यक्त होत आहे.

गरिब कुटुंबांवर बेघर हाेण्याची वेळ

गावातील गरीब नागरिकांनी शासनाच्या तुटपुंज्या अनुदानावर घरकुले बांधली आहेत. या घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. राहते घर कोसळण्याच्या भितीमुळे गावातील गरीब कुटुंब कर्जबाजारी होऊन बेघर होण्याच्या अवस्थेत आहेत.

अधिकारी गांधारीच्या भूमिकेत

दगड खाणींमुळे होणारे प्रदूषण, वन विभागाच्या हद्दीला लागून सुरू असलेले उत्खनन, खाणीतून बेसुमार दगडाचे उत्‍खनन, नागरिकांच्या घरांना जात असलेले तडे, तरीही महसूल, वन विभागाचे अधिकारी गांधारीच्या भूमिकेत असल्‍याने ग्रामस्‍थांकडून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT