मिरज : दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) इ. पी. हायस्कूलने (EP School) विद्यार्थ्यांना शिक्षित करून सक्षम केले, असे प्रतिपादन डॉ. अमित कामले (Dr Amit Kamle) यांनी केले.
१६ ऑगस्ट १९५७ हा एस्तेर पॅटन यांचा जन्म दिवस. या दिवशी एस्तेर पॅटन दिन साजरा केला जातो. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एस्तेर पॅटन हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थिनी श्रीमती सरोजिनी चोपडे होत्या. यावेळी सौ. भारती पाटील, ॲड. डी. डी. धनवडे, दीनानाथ कदम, मुख्याध्यापिका सुहासिनी कदम, श्री. जयकर, श्री. अघमकर यांच्यासह आजी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कामले बोलत होते.
एस्तेर या कोल्हापूर येथील वेस्टर्न इंडिया मिशन, गर्ल्स बोर्डिंग स्कूल, अनाथाश्रमात मिशनरी होत्या. इ. पी. हायस्कूल १८७३ पासून स्त्री शिक्षणाचे कार्य करीत आहे. कोल्हापुरातील मुलींची ही पहिली शाळा. २७ नोव्हेंबर १९१४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. कोल्हापूर चर्चचे पहिले भारतीय पाळक रेव्ह. शिवरामजी मासोजी हे होते. रेव्ह. शिवरामजी मसोजी हे डॉ. अमित कामले ह्यांचे पणजोबा. डॉ. अमित कामले यांचे आजोबा जीवनराव नानासाहेब कांबळे (जे. एन. कांबळे सर) १९६१-१९६७ या काळात इ. पी. हायस्कूलचे १६ वे मुख्याध्यापक होते. त्यांच्या आजी श्रीमती मनोरमा जीवनराव कांबळे देखील इ. पी. हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. त्यांची आई जया दीपक कामले त्यांच्या मावश्या देखील या शाळेचा भाग होत्या.
डॉ. अमित कामले म्हणाले, इ. पी. हायस्कूलचा १५० वर्षांचा वारसा हा एक दीर्घ आणि समृद्ध इतिहास, शाश्वत यश दर्शवितो. सर विल्यम वॉनलेस, रेव्ह. वायल्डर आणि एस्तेर पॅटन यांनी आपल्या समाजाला बहुमोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच अनेक लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना सक्षम बनवले आहे. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आज आपण पुढील १५० वर्षांसाठी शाळेच्या दृष्टिकोनाचा विचार करणे गरजेचे आहे आणि भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते कसे विकसित आणि अनुकूल होईल याचा विचार केला पाहिजे.