कोल्हापूर : महावितरण कंपनीच्या पुनर्रचनेविरोधात महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांतील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते यांचा गुरुवार पासून तीन दिवसांचा संप आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून संपास सुरुवात झाली. या संपामुळे महाराष्ट्रावर अंधाराचे सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली आहे.
महावितरण कंपनीच्या पुनर्रचनेस कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. पुनर्रचना करण्यासाठी कर्मचारी संघटना कृती समितीने काही सूचना केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी केल्यास पुनर्रचनेस पाठिंबा असेल, असे जाहीर केले होते. मात्र प्रशासनाने या सूचनांना केराची टोपली दाखविल्याने कृती समितीने संपाचे हत्यार उपसले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून संप सुरू करण्यात आला. मध्यरात्रीपासून शाखा कार्यालयापासून उपकेंद्रांपर्यंत कामावर असणारे अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी संपावर गेले. 2021 मध्ये राज्यात ग्राहक संख्या 2 कोटी 89 लाख, उपविभाग 638 होते. एकूण कर्मचारी 81,696 होते तर 2025 मध्ये एकूण वीज ग्राहक 3 कोटी 17 लाख झाले. उपविभाग 648 मात्र कर्मचारी मंजूर पदे 81,900 आहेत. या संपात राज्यातील जनतेने व वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.