कोल्हापूर : महावितरणमध्ये पुनर्रचनेमुळे महसुलावर परिणाम झाला असताना गेल्या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे वीज बिल भरण्यात जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
एकीकडे राज्यात महसूल वसुलीस अल्प प्रतिसाद मिळत असताना कोल्हापुरात मात्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना नदीकाठी पारंपरिक कनेक्शनचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा कोल्हापुरकरांतून व्यक्त होत आहे.
राज्यात 46 मंडळ (जिल्हा) कार्यालय आहेत. त्यामध्ये सर्वाधिक महसूल कोल्हापूर जिल्ह्यातून मिळाला आहे. महावितरणच्या 45 सर्कल कार्यालयांपैकी कोल्हापूर कार्यालयाने 2 हजार 509 कोटी 81 लाख रुपयांचा महसूल दिला असून तो राज्यात अव्वल ठरला आहे. दोन हजार 498 कोटी 71लाख रुपये उद्दिष्ट असताना 2 हजार 509 कोटी 81 लाख रपये भरले आहेत. सर्वात कमी महसूल परभणी जिल्ह्यातून मिळाला आहे. परभणी जिल्ह्यात अद्याप साडेपाचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोन कोटी रुपयांची थकीत रक्कम असून ही रक्कम काही तांत्रिक कारणांनी प्रलंबित आहे. महसूल वसुली चांगली असल्यामुळे येथील ग्राहकांना सुविधाही त्या दर्जाच्या मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.
नदीकाठच्या शेती पंपांचा प्रश्न मार्गी लावा
कोल्हापुरातून शंभर टक्के महसूल मिळतो. गळती व चोरीचे प्रमाण नगण्य आहे. सौर कृषी पंपाच्या सक्तीमुळे नदीकाठची पारंपरिक कनेक्शन बंद केली आहेत. परिणामी, पाणी असूनही विजेअभावी पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.