Kolhapur Elections (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur Elections: कोल्हापूरकरांनो, तुम्ही राजर्षी शाहू, शिव-शंभूंचे वारसदार आहात

निवडणुकीत प्रलोभनांना लाथ मारा, अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही!

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पडद्यामागच्या यंत्रणा कमालीच्या सक्रिय झाल्या असून, लक्ष्मीदर्शनाचा खेळ उघडपणे सुरू झाला आहे. मतांचा सौदा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. पण, कोल्हापूरच्या सुजाण मतदारांनो, सावधान! तुम्ही राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार आहात.

शिव-शंभूंचे रक्त तुमच्या धमन्यांत सळसळते आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा रांगडा कोल्हापुरी म्हणून आपली महाराष्ट्रभर ओळख आहे. मग विकासाच्या नावाने आजवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याची संधी असताना, आपण क्षणिक प्रलोभनांना बळी पडणार का?

निवडणूक की गुंतवणूक?

गेल्या काही दशकांत महापालिका निवडणुकांची व्याख्याच बदलली आहे. नगरसेवक पद हे आता लोकसेवेचे माध्यम न राहता, गुंतवणूक करून बक्कळ परतावा मिळवण्याचे साधन बनले आहे. निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि पुढची पाच वर्षे जनतेकडून त्याची दामदुप्पट वसुली करायची, असा हा घातक पायंडा पडला आहे. तुम्ही या गुंतवणूकदारांना निवडून देणार, की सुशिक्षित आणि विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार? हा आजचा कळीचा प्रश्न आहे.

53 वर्षांपूर्वी महापालिका स्थापन झाली, तेव्हा कोल्हापूर हे एक टुमदार शहर होते. आज 53 वर्षांनंतरही मोठे खेडे ही ओळख पुसली गेलेली नाही, उलट सोयी-सुविधांचा बकालपणा मात्र वाढला आहे. शहराच्या 40 वर्षांनंतरच्या गरजा ओळखून नियोजन करणारी व्हिजनरी दृष्टी आपल्याकडे का नाही? रस्ता रुंदीकरण थांबवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा करणारे नेते आणि सार्वजनिक जागांचा बाजार मांडणारी टोळी याच सभागृहात जन्माला आली. काम न करता बिले काढणारे अधिकारी आणि गल्लोगल्ली वाढलेले फाळकूटदादा यांनी शहराला टपऱ्यांचे गाव बनवून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 26 अभियांत्रिकी महाविद्यालये आणि अनेक शिक्षणसंस्था आहेत.

दरवर्षी हजारो उच्चशिक्षित तरुण बाहेर पडतात; पण त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शहरात कोणतेही मोठे प्रकल्प उभे राहिले नाहीत. पहाटे मध्यवर्ती बसस्थानकावर जाऊन पहा, पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये आपला तरुण मुलगा डोळ्यात तेल घालून स्थलांतर करत असतो. मुंबई, बंगळूर, हैदराबादकडे जाणारी ही तरुण मुले म्हणजे कोल्हापूरचे भविष्य आहेत. ही मुले बाहेर गेल्यामुळे कोल्हापुरातील घरांना आज वृद्धाश्रमांचे स्वरूप आले आहे. जर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असत्या, तर कोल्हापूरचे हे वैभव परक्या शहरात राबले नसते. यासाठी महापालिकेवर दूरदृष्टी असलेले आणि उच्चविद्याविभूषित नेतृत्व हवे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT