गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत जनसुराज्य व जनता दल यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपावर एकमत झाले असून या युतीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शिंदे सेनेला घेण्यावरही चर्चा झाली असून त्या गटासोबत चर्चा झाल्यानंतर जागावाटपाचा अंतिम फार्म्युला सांगण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून समजली आहे.
गडहिंग्लज नगरपालिकेसाठी जनता दलाच्या नेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी ना. हसन मुश्रीफ यांना कडवी टक्कर देण्यासाठी मोठी आघाडी करण्याचा निर्धार करत गेल्या महिन्याभरापासून नियोजन लावले होते. यातच भाजपा महायुतीमधून राष्ट्रवादीसोबत जाणार असे वाटत असताना कोरी यांनी लावलेल्या योग्य नियोजनामुळे भाजाने जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला. जनसुराज्यही जनता दलासोबतच जाणार आहे. आता यामध्ये भर म्हणून पालकमंत्री आबिटकर यांच्याबरोबरही चर्चा असून ही चर्चा अंतिम झाल्यास आबिटकर गट जनता दलासोबत गेल्यास एक मोठी आघाडी तयार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत होण्याची शक्यता अधिक आहे.
पालकमंत्री आबिटकर यांच्या निर्णयाकडे लक्ष
ना. हसन मुश्रीफ यांना टक्कर देण्यासाठी जनता दल, भाजप, जनसुराज्य हे एकत्र आले आहेत. आता यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शिंदे सेनेशीही चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. पालकमंत्र्यांनी जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर गडहिंग्लज पालिकेच्या निवडणुकीत वेगळाच रंग चढणार आहे.