कोल्हापूर : चेष्टा-मस्करी सुरू असतानाच जुन्या घटनांचा संदर्भ येऊन वादावादी सुरू झाली आणि त्यातूनच त्याने गळा चिरून आपल्याच मित्राचा खून केला. ऐन गणेशोत्सवात गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेने नातेवाईकांसह परिचितही अवाक् झाले. मोहन पवार व संशयित चंद्रकांत शेळके यांच्यात चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासूनची मैत्री होती. पण किरकोळ वादाने या मैत्रीलाच मूठमाती दिली.
सकाळी शेळके हा पवार यांच्या हनुमाननगरातील घरी आला होता. त्यांच्यात चेष्टा-मस्करी सुरू होती. त्यातून काही जुने संदर्भ आले आणि वाद सुरू झाला. त्यातच पवार यांनी आईवरून शिवीगाळ केल्याने प्रकरण हातघाईवर आले. संतप्त झालेल्या शेळके याने घरात पडलेला धारदार चाकू घेऊन पवार याच्यावर जोरात हल्ला केला. गळ्यावर झालेल्या हल्ल्याने पवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. शरीराची हालचाल थंडावल्याने भांबावलेल्या संशयिताचा घरातून पळून जाताना समईला धक्का लागला.
समईमुळे घरातील साहित्याला आग लागली. काही वेळाने घरातून धुराचे लोट आल्याने शेजारील नागरिकांनी घराकडे धाव घेतली असता घरात पवार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजीव झाडे घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून मारेकर्याचे नाव निष्पन्न झाले. रात्री उशिरा त्यास ताब्यात घेण्यात आलेे. मोहन पवार हा रिक्षा व्यावसायिक असून चार वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. मुलगा पुष्कराजसमवेत राहतो. पुष्पराज पवार यांनी याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. प्रारंभी हा खून चोरीच्या संशयातून झाल्याची चर्चा होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा सुगावा लागला आणि खुनाचा उलगडा झाल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.