कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नववीत शिकणारी स्नेहा व चौथीला असणारा सोहन. दोघा भावंडांनी कोरोनाच्या काळात घरी बसून तब्बल १५० चित्रे साकारली. लँडस्केपमध्ये जलरंगातील ही चित्रे सर्वांची मने मोहवून जात होती. बाहेर कोरोनासारखी गंभीर परिस्थिती असतानाही त्यांनी निसर्गचित्रांची उधळण केली. कोरोनानंतर चित्रांचे प्रदर्शन भरवले. यात काही चित्रांची विक्री झाली. या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी यंदा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे. तब्बल ८० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य त्यांनी ११० गरजू मुलांना दिले आहेत. कोल्हापुरातील चित्रकार नागेश हंकारे यांच्या मुलांची ही गोष्ट.
तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगालाच कोरोनाच्या संकटाने घेरले. त्याचा फैलाव थांबविण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाले. शाळाही बंद होत्या. या काळात घरात बसून काय करायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच होता. अशावेळी स्नेहा व सोहन यांनी जलरंगातील निसर्गचित्रे काढली. काही कोल्हापुरातील निसर्गसौंदर्य दाखवणाऱ्या चित्रांचाही यामध्ये समावेश होता. एका वर्षांत दोघांनी मिळून १५० चित्रे काढली. या चित्रांचे करायचे काय, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. यावर दोघांनी या चित्रांचे प्रदर्शन भरवूया, असे सुचविले. चित्रकार हंकारे यांना चित्रप्रदर्शनाचा अनुभव होताच. त्यांनी तत्काळ त्याची तयारी सुरू केली. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये प्रदर्शन भरवले. माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. समाजातील मान्यवरांनी चित्रे खरेदी केली. आमदार सतेज पाटील यांनीही चित्रे खरेदी करून मंत्रालयात चित्रांना स्थान दिले. चित्रांच्या विक्रीतून सुमारे ८० हजार रुपयांची रक्कम जमा झाली. ही मदत कोरोनाग्रस्त किंवा गरजू विद्यार्थ्यांना द्यावी, अशी संकल्पना स्नेहा व सोहनने मांडली. या संकल्पनेला नागेश हंकारे व त्यांच्या पत्नीनेही संमती दिली. आणि यंदा हा निधी त्यांनी ११० गरजू विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्यासाठी खर्च केला. शुक्रवारी (दि. २३) मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात याबद्दल त्यांचा सत्कारही झाला.
स्नेहा ही सध्या संजय घोडावत अतिग्रे येथे JEE ची तयारी करीत आहेत. तर सोहन प्रायव्हेट हायस्कुल येथे ६ वी मध्ये शिकत आहे. मुख्याध्यापक संघात झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाट्न माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते झाले तर पल्लवीताई कोरगांवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मा. शरयू डिंगणकर, मा दादासाहेब लाड, चित्रकार बाळ डेळेकर, अजय दळवी, विजय टिपुगडे, सचिन पाटील, प्रशांत जाधव, बबन माने, गजानन धुमाळे, मछिंद्र हंकारे शोभा शिंदे, सुमन भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक टी. आर. पाटील यांनी केले तर सुनिता हंकारे यांनी आभार प्रदर्शन केले सूत्रसंचालन रावसाहेब कांबळे यांनी केले.