कोल्हापूर : ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या कोसळधारांमुळे 15 दिवस आधीच कोल्हापुरात मान्सूनचा फील येत आहे. मंगळवारी वळवाच्या पावसाने थैमान घातल्यानंतर बुधवरीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी काहीकाळासाठी मध्यम सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली होती. गेल्या 24 तासांत शहरात 37 मि.मी. पावसाची नोंद झाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुमारे फूटभर वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवार (दि. 23) पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे पुढील दोन दिवसही पावसाचे असणार आहेत.
धुवाँधार पावसाने शहराला मंगळवारी अक्षरशः झोडपून काढले. बुधवारीदेखील पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. यामुळे जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी तीनच्या दरम्यान ढग दाटून आले, जोरदार पाऊस होईल, असे वातावरण झाले मात्र, काहीकाळासाठी मध्यम सरी कोसळल्या. यानंतर रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन मे महिन्यात रेनकोट, छत्री, टोपी घालून नागरिकांना बाहेर पडावे लागले. अचनाक कोसळणार्या सरींमुळे तर दुचाकीस्वारांची त्रेधा उडाली होती. याशिवाय छत्री, रेनकोट, टोपी खरेदीकरण्यासाठी देखील गर्दी पहायला मिळाली.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा घाटावरील मंदिरांची शिखरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत. वळवाचा दणका असाच सुरू राहिल्यास राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सध्या बंधार्याच्या काठाजवळ पाणी आहे. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी डबकी साठली आहेत. काही ठिकाणी दलदल झाली आहे. यामुळे नागरिकांसह दुचाकीस्वारांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.