कोल्हापूर: कर्नाटकातील देवदर्शन आटोपून कोल्हापूरकडे परतत असताना कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मोटारीला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात दोघेजण जागीच ठार झाले. तर वैष्णवी पाटील यांच्यासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
चित्रदुर्ग कलबुर्गी महामार्गावर पहाटे चार वाजल्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैष्णवी पाटील यांच्यासह तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे समजू शकली नाहीत. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात पहाटे झालेल्या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ तातडीने चित्रदुर्ग जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत.
पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील कुटुंबीय समवेत दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी कर्नाटकात गेल्या होत्या. शनिवारी रात्री त्यांनी बेंगलोर सोडले. कोल्हापूरकडे परतत असताना चित्रदुर्ग कलबुर्गी महामार्गावर मोटार आणि म** मोटार यांच्यात जोरात धडक झाली. या भीषण अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. वैष्णवी पाटील यांच्यासह तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांना चित्रदुर्ग येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या भीषण अपघातात मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दोन्ही वाहनात जोरदार धडक झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पहाटे गर्दी केली होती. चित्रदुर्ग येथील सर्कल पोलीस इन्स्पेक्टर भालचंद्र नाईक फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यात मदत केली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.