कोल्हापूर : भाविकांसह नागरिकांच्या गर्दीने सतत गजबजलेल्या महाद्वार रोडवर मद्यधुंद सांगलीतील कार चालकाने थरार घडविला. भरधाव मोटारीने महाद्वार रोडने जाणार्या चार महिलांना धडक दिली, तर दुचाकींना जोरात ठोकरले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोन कर्मचार्यांनी पाठलाग करून भरधाव मोटार रोखल्याने मोठा अनर्थ टळला. संतप्त जमावाने कारचालकाची बेदम धुलाई केली. मंगळवारी सायंकाळी महाद्वार रोडवर ही घटना घडली. सुदैवाने प्राणहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जुना राजवाडा पोलिसांनी कारचालक प्रसाद दत्तात्रय सुतार (वय 29, रा. वखारभाग, सांगली) यांच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत सुतारविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार मंजुनाथ बेळमकर व संतोष करनूरकर यांनी जिवाची पर्वा न करता पाठलाग करून मोटार रोखल्याने नेहमी गजबजलेल्या महाद्वार रस्त्यावरील मोठा अनर्थ टळला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला पापाची तिकटीकडून महालक्ष्मी चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने मोटार धावू लागली. नेमके या वेळेला महाद्वार रस्ता भाविक, नागरिकांसह व्यापार्यांनी फुलला होता. कार चालकाने एकापाठोपाठ तीन ते चार दुचाकींना जोरात ठोकरले. नागरिकांनी आरडा-ओरड करून कार चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद अवस्थेत चालकाचा ताबा सुटल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
कारचा वेग वाढतच होता. रस्त्यावरून जाणार्या महिलांना कारने ठोकरले. महिला रस्त्यावर कोसळल्या. तरीही चालकाने कार वेळीच न रोखल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. जमावाने मोटारीचा पाठलाग सुरू केला. मध्यवर्ती चौकात ड्युटीवरील वाहतूक शाखेकडील मंजुनाथ बेळमकर, संतोष करनूरकर यांनीही कारचा पाठलाग सुरू केला.
वाहतूक पोलिसांनी कार थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, संतप्त जमावाने चालक प्रसाद सुतार याला कारमधून खाली खेचून अंगावरील कपडे फाटेपर्यंत धुलाई केली. जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकाला जमावाच्या ताब्यातून घेतले. रात्री उशिरा चालकाची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस आणि महाद्वार रोडवरील व्यापारी, नागरिक आणि भाविकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. कारने ठोकरल्याने दुचाकी वाहनांचे सुमारे 60 ते 70 हजारांचे नुकसान झाल्याचे पोलिस निरीक्षक झाडे यांनी सांगितले.