कोल्हापूर : कसबा बावडा येथे ड्रेनेजलाईनचे कोणतेही काम न करता ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याला महापालिकेने अदा केलेल्या तब्बल 85 लाख रुपयांच्या बिलामुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराने बोगस सह्यांद्वारे ही रक्कम घेतल्याची कबुली दिली असून, ती रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सर्व कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे. याअंतर्गत तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवून खुलासा मागवण्यात आला आहे. दोषी आढळल्यास फौजदारी कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक सत्यजित कदम (शिवसेना-शिंदे गट) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर महापालिकेच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर आणि अधिकारी-ठेकेदार साखळीतील पारदर्शकतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून, महापालिकेतील भ्रष्टाचाराचा नमुना म्हणून या प्रकाराकडे पाहिले जात आहे. बोगस सह्यांमुळे ठेकेदाराला मिळालेली मोठी रक्कम आणि अधिकार्यांची भूमिका ही प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.