कोल्हापूर : ‘फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन’ नियतकालिकाच्या मुख्य संपादक (Editor in Chief) म्हणून डॉ. पद्मरेखा शिशिर जिरगे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे. हे नियतकालिक Asia Pacific Initiative on Reproduction चे अधिकृत जर्नल असून ग्लोबल साऊथमधील सर्वाधिक नियतकालिकांपैकी एक आहे. ही नियुक्ती त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व व्यावसायिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
‘फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन’ या नियतकालिकाला जागतिक स्तरावर मोठा वाचकवर्ग असून पुनरुत्पादन वैद्यकशास्त्रातील दर्जेदार संशोधन प्रकाशित केले जाते. मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि चीन अशा विस्तृत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील संशोधन या जर्नलमध्ये समाविष्ट असते. डॉ. जिरगे दि. 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी Indian Society of Assisted Reproduction च्या Journal of Human Reproductive Sciences या नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून कार्य केले असून त्यानंतर फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शनच्या उपसंपादक (Deputy Editor)) म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
त्यांची ही नियुक्ती प्रजनन व पुनरुत्पादन विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगदानाची तसेच जैववैद्यकीय संशोधनातील वैद्यकीय, कायदेशीर व नैतिक बाबींच्या सखोल ज्ञानाची पोचपावती आहे. याशिवाय मानवी पुनरुत्पादन क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याबद्दल डॉ. जिरगे यांना Sigma Xi या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन सन्मान संस्थेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले आहे. 1886 मध्ये कॉर्नेल विद्यापीठात स्थापन झालेल्या या संस्थेच्या आजवरच्या सदस्यांमध्ये अल्बर्ट आईनस्टाईन, रिचर्ड फाईनमन, फ्राान्सिस क्रिक, जेनिफर डूडना यांसारखे 200 हून अधिक नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक समाविष्ट आहेत. अंडाशयाच्या क्षमतेचा ovarian reserve स्त्री वंध्यत्व व IVF यशावर होणारा परिणाम तसेच स्त्री जननेंद्रिय क्षयरोग आणि वंध्यत्व या विषयांवरील त्यांच्या संशोधनासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.