कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कोल्हापूर विभागाला रक्षाबंधनची तब्बल 3 कोटी रुपयांची ‘ओवाळणी’ मिळाली. शुक्रवार, दि. 8 ते रविवार, दि. 10 ऑगस्ट या कालावधीत 3 कोटी 1 लाख 41 हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती परिवहन विभाग नियंत्रकांनी दिली.
रक्षाबंधनसाठी जादा वाहतुकीकरिता विभागाने नियोजन केले होते. यात 8 लाख 7 हजार कि.मी. अंतराच्या प्रवासात सवलत मूल्यासह हे विक्रमी उत्पन्न महामंडळाला मिळाले. उत्पन्नवाढीसाठी विभागातील सर्व चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षीय कर्मचारी, आगार व्यवस्थापक व सर्व अधिकारी यांनी मेहनत घेतली. याच धर्तीवर आगामी गणेशोत्सवातही जादा वाहतुकीचे नियोजन करून अशीच दमदार कामगिरी करून राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन प्रभारी विभागीय नियंत्रक यशवंत कानतोडे यांनी केले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, कामगार अधिकारी संदीप भोसले, सुरक्षा अधिकारी, वाहतूक अधीक्षक उपस्थित होते.