कोल्हापूर : ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल पाहताना विद्यार्थी.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

12th HSC Exam | बारावी निकालात कोल्हापूर विभाग सहाव्या क्रमांकावर

गतवर्षी 93.64, तर यंदा 89.97 टक्के; दोन नंबरवरून घसरण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : बारावी परीक्षेत सांगली, सातारासह कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत यंदा 3.67 टक्क्यांनी घसरला. गेल्यावर्षी निकाल 93.64 लागला होता, तर यंदा 89.97 टक्के लागला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी ऑनलाईन निकाल जाहीर केला. यंदाही मुलांपेक्षा 9.29 टक्के मुलींचा निकाल अधिक आहे. टक्केवारी घसरल्याने गतवर्षी दुसर्‍या क्रमांकावर असलेला विभाग यंदा राज्यात सहाव्या क्रमांकावर आला आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर, सांगली, सातारामधील 1 हजार 19 कनिष्ठ महाविद्यालयांत बारावी परीक्षा झाली. कोल्हापूर विभागातील 99 हजार 398 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कोल्हापूर जिल्हा अव्वल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 47 हजार 838 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 43 हजार 946 उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 91.86 आहे. सांगलीतून 30 हजार 806 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 26 हजार 527 उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 86.10 इतकी आहे. सातारा जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी 90.89 आहे.

जिल्ह्याचा निकाल 91.86 टक्के

बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 91.86 टक्के लागला. विभागात जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले. 90.89 टक्क्यांसह सातारा दुसर्‍या स्थानावर, तर 86.10 टक्क्यांसह सांगली तिसर्‍या स्थानावर आहे.

जिल्ह्यातून 73 केंद्रांमधील 387 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून 47 हजार 838 विद्यार्थ्यांपैकी 43 हजार 946 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा 98.23 टक्के, कला शाखेचा 80.56 टक्के, वाणिज्य शाखेचा 85.87 टक्के, व्यावसायिक शाखेचा निकाल 90.67, तर आयटीआयचा निकाल 87.80 टक्के लागला.

कोल्हापुरातही मुलीच अव्वल

राज्यातील नऊ विभागांमध्ये मुलींच्या उत्तीर्ण होण्याचा टक्का यंदाही मुलांच्या तुलनेत जास्त आहे. हीच परंपरा कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींनीही कायम राखली. जिल्ह्यातील मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का 95.59 इतका आहे. तर मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 88.62 आहे.

20 हजार 796 विद्यार्थ्यांना सवलत गुण

खेळाडू, एनसीसी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलत गुण देण्यात येतात. त्यानुसार यावर्षी राज्यातील सुमारे 20 हजार 796, तर कोल्हापूर विभागातील 2 हजार 405 विद्यार्थ्यांना प्रावीण्याचे गुण देण्यात आले आहेत. कॉपी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे 2 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली.

गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठी 17 मेअखेर मुदत

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकनासाठी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेल, हस्तपोेच, रजिस्टर पोस्ट यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना वापरता येईल. यासाठी http:// mahahsscboard.in या संकेतस्थळावर 3 ते 17 मेदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे

‘कोल्हापूर’चा टक्का का घटला? यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्र व परीक्षा कक्षात सीसीटीव्ही तसेच ड्रोन चित्रणाचा केलेला वापर, झूम अ‍ॅपच्या मदतीने जिल्हा दक्षता समितीचे नियंत्रण, यामुळे परीक्षेतील कॉपीसह गैरप्रकारांना आळा घालण्यात यश आले. गेल्यावर्षीपासून कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात निकालातील गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. परिणामी, यंदा निकालातील पारदर्शकता वाढून टक्केवारीचा फुगवटा कमी झाला.
राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT