कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेसाठी पुढील वर्षासाठी (2026-27) 700 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी (दि. 12) राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राज्यस्तरीय बैठकीत सादर केला जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीला 2025-26 या वर्षासाठी 642 कोटींचा निधी मंजूर आहे. या निधीपैकी सुमारे 70 टक्के निधी खर्च होत आला आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी लागू केलेल्या आचारसंहितेमुळे कामांची गती काहीशी कमी झाली होती. मात्र, जिल्ह्यात सुमारे 96 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याने आता आचारसंहितेनंतर ही कामे वेगाने पूर्ण होतील. उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यता येत्या दहा दिवसांत दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील वर्षांसाठीचा आराखडा बुधवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. यानंतर तो गुरुवारी राज्यस्तरीय समितीसमोर सादर केला जाईल. गतवर्षीच्या निधीच्या तुलनेत दरवर्षी सरासरी पाच ते दहा टक्के वाढ केली जाते. सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री फडणवीस यांच्याकडे आग््राह धरल्यास यावर्षीच्या 642 कोटींच्या तुलनेत पुढील वर्षासाठी 700 कोटींपर्यंत निधी मिळण्याची शक्यता आहे.