Kolhapur district surgeon office corruption : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या कारभाराचा पर्दाफाश Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur district surgeon office corruption : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या कारभाराचा पर्दाफाश

शिवसेनेचे ‌‘स्टिंग ऑपरेशन‌’; वैद्यकीय बिलांच्या फाईलसोबत सापडली ‌‘हिशेब वही‌’

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या कारभाराचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सोमवारी सकाळी स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला. वैद्यकीय बिलांच्या फाईल तपासताना, पैशाच्या देवाण-घेवाणीची नोंद असलेली ‌‘हिशेब वही‌’ सापडली. हा प्रकार सुरू असतानाच एका शिपायाने पलायन केले. सायंकाळी त्याची चंदगड येथे बदली करण्यात आली. या सर्व प्रकाराने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आदींच्या वैद्यकीय बिलांच्या फाईल्स मंजूर करताना अर्थपूर्ण घडामोडी होतात; अन्यथा फाईल प्रलंबित ठेवण्याचे प्रयत्न केले जातात, हा प्रकार शिवसेनेने सोमवारी उघडकीस आणला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, प्रभारी प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील, शिपाई शशिकांत कारंडे, दिलीप शिंदे यांना घेऊन ते कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये गेले. तेथील तिजोरीत अनेक मंजूर, तसेच प्रलंबित फाईल आढळून आल्या. मंजूर फाईल्स संबंधितांना का दिल्या नाहीत? त्या न देण्यामागे तुमचा हेतू काय? अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी टेबलची तपासणी करताना पैशाची देवाण-घेवाण केलेली ‌‘हिशेब वही‌’ आढळून आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

यानंतर क्षयरोग विभागाच्या मागील बाजूला असणाऱ्या ग््राामीण रुग्णालय नियंत्रण कार्यालयात 2016 पासूनच्या फाईल आढळून आल्या. इतक्या वर्षांच्या फाईल प्रलंबित का? अशी विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्याने आपल्याकडे नुकताच हा कार्यभार आल्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, जिल्हा युवासेना मनजित माने, उपशहर प्रमुख संजय जाधव, उपशहर प्रमुख संतोष रेडेकर, उपशहर प्रमुख राहुल माळी, अक्षय पाटील, पप्पू कोंडेकर, राहुल माळी, अभिजित बुकशेट, युवराज जाधव, अनिकेत घोटणे, प्रवीण पालव, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

‌‘हिशेब वही‌’चे वाचन अन्‌‍ सर्वच अवाक्‌‍

सापडलेली ‌‘हिशेब वही‌’ घेऊन अधिकारी व आंदोलक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात आले. तिथे या वहीचे वाचन केले. त्यात मॅडम, साहेब यांच्यासह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांना 1 हजारापासून ते अगदी 2 लाख रुपयांपर्यंत दिलेल्या रकमेचे आकडे होते. या वहीवर 3 नंबर रजिस्टर असे लिहिले होते. यामुळे नंबर 1, 2 रजिस्टर शोधली, ती मात्र सापडली नाहीत.

दै. ‌‘पुढारी‌’ने वर्षभरापूर्वीच केली होती पोलखोल

दै. ‌‘पुढारी‌’ने ‌‘जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिलांच्या फाईलमध्ये शोधला जातोय अर्थ‌’ असे वृत्त प्रसिद्ध करून पोलखोल केली होती. यावेळी ‌‘हिशेब डायरी‌’चादेखील विशेष उल्लेख केला होता, अखेर ती सापडली.

सापडलेल्या ‌‘हिशेब वही‌’ची चौकशी करावी. दोषींवर गुन्हे दाखल करावेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यातील सहभागींच्या संपत्तीची चौकशी करावी.
- संजय पवार, शिवसेना नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT