कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शनिवारी जिल्ह्यात चुरशीने मतदान झाले. अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

ZP Panchayat samiti election | कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने 74.35 टक्के मतदान

गतवेळच्या तुलनेत टक्का घसरला : बाचाबाची, हाणामारी, सौम्य लाठीमार : उद्या फैसला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात शनिवारी चुरशीने आणि अटीतटीने 74.35 टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा घसरला असला, तरी बहुतांशी मतदारसंघांत ईर्ष्येने मतदान झाले. मतदारांनी मतदान कुणाच्या पारड्यात टाकले, याचा फैसला सोमवारी (दि. 9) होणार आहे. बाचाबाची, हाणामारी, सौम्य लाठीमार असे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. नाधवडे (ता. भुदरगड) येथे मतदाराने मतदानानंतर ईव्हीएम जमिनीवर आपटले, तर मलगड (ता. चंदगड) येथे मतदान केंद्रात वृद्ध महिला मतदाराचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आरळगुंडी (ता. आजरा) येथे एकावर चाकूहल्ला झाला.

जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 अशा एकूण 696 उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद झाले. मतदानासाठी एकूण 2 हजार 691 मतदान केंद्रांवर एकूण 5,402 ईव्हीएमचा वापर करण्यात आला. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 14 हजार 130 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये झालेला तांत्रिक बिघाड वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बहुतांशी प्रत्येक मतदारसंघात सोयीच्या आघाड्या झाल्या होत्या. त्यामुळे एकमेकांचे दोस्तही एकमेकांविरोधात लढत असल्याने बहुतांशी सर्वच लढती चुरशीच्या ठरल्या, त्याची झलक शनिवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र दिसली. मतदान केंद्रांवर प्रचंड उत्साह, ईर्ष्या आणि चुरस दिसत होती. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

सकाळपासूनच मतदारांत मतदानाचा उत्साह दिसत होता. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात 10.58 टक्के मतदान झाले. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत 16.08 टक्के मतदान झाले. सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत 17.19 टक्के मतदान झाले. दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत 14.86 टक्के मतदान झाले. अखेरच्या दोन तासांत 15.54 टक्के असे एकूण 74.35 टक्के मतदान झाले. 2017 साली झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात 76.84 टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का काहीसा घसरला.

नाधवडे (ता. भुदरगड) येथील मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर जयवंत वायदंडे या मतदाराने मतदान मतपत्रिकेवर घ्यावे या मागणीसाठी ईव्हीएम जमिनीवर आपटले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गिजवणेत मतदान केंद्राबाहेर प्रचार केल्याने दोन गटांत हाणामारी झाली. तारदाळ (ता. हातकणंगले) येथेही दोन गटांत हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. आरळगुंडी येथे मतदानावरून झालेल्या वादातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला करण्यात आला. राशीवडे बुद्रुक ता. राधानगरी येथेही दोन गटात बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मलगड ता. चंदगड येथे मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या 90 वर्षीय वृध्द महिलेचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. सुरूपली येथे नवदाम्पत्यांने विवाहातून येत मतदानाचा हक्क बजावला तर परळेत मतदानाचा हक्क बजावून नवरदेव बोहल्यावर चढला. कोडोलीत एका महिला मतदाराने सायकलवरून येत मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हाधिकार्‍यांची मतदान केंद्रांना भेट

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कागल तालुक्यातील कसबा सांगव, हातकणंगले तालुक्यातील यळगुड, रेंदाळ, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील मुडशिंगी येथील मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची खातरजमा केली.

सर्वाधिक गगनबावड्यात, सर्वात कमी आजर्‍यात मतदान

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान गगनबावडा तालुक्यात झाले. या ठिकाणी 86.03 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान आजरा तालुक्यात झाले. या ठिकाणी 63.90 टक्के मतदान झाले.

17 लाख 40 हजार 7 मतदारांनी बजावला हक्क

जिल्ह्यातील 12 तालुक्यांत 23 लाख 40 हजार 199 मतदार आहेत. त्यापैकी 8 लाख 94 हजार 115 पुरुष मतदार,

8 लाख 45 हजार 857 महिला मतदार, तसेच इतर 35 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 74.35 टक्के म्हणजेच 17 लाख 40 हजार 7 मतदारांनी मतदान केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT