PGI Report | गुणवत्तेचा वाजला डंका; देशात कोल्हापूरची वाहवा!  
कोल्हापूर

PGI Report | गुणवत्तेचा वाजला डंका; देशात कोल्हापूरची वाहवा!

‘पीजीआय’ अहवालात प्रथम; शिरपेचात मानाचा तुरा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या २०२४-२५ च्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) अहवालात कोल्हापूर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ६०० पैकी ४६३ गुण मिळवत जिल्ह्याने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळविले. मागील वर्षी ३४५ गुणांसह ६९ व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने तब्बल ११८ गुणांची वाढ नोंदवत ही उल्लेखनीय झेप घेतली हे विशेष...

मागील वर्षाच्या ‘पीजीआय’ अहवालाचे विश्लेषण करून कमी गुण पडलेल्या कारणांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत (डाएट) रोडमॅप तयार करण्यात आला. जिल्ह्याने अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया, डिजिटल अध्ययन तसेच शाळा सुरक्षा, बालकांचे संरक्षण यासारख्या विविध निकषांमध्ये लक्षणीय सुधारणा केली. ‘मिशन उत्कर्ष’ उपक्रमामुळे गुणवत्तावाढीस मोठी चालना मिळाली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या समन्वयातून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) धर्तीवरील प्रश्नसंच तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे सातत्याने मूल्यमापन करून कमतरता दूर करण्यासाठी विशेष कृती आराखडे राबविण्यात आले.

भौतिक सुविधांमध्येही मोठी वाढ करण्यात आली. विविध योजनांमधून शाळांना निधी उपलब्ध करून स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत संगणक, रॅम्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा उभारण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामही शंभर टक्के पूर्ण केले. तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., डाएटचे अधिकारी, शिक्षण विभाग, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक यशाचा टप्पा गाठला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याने केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ‘पीजीआय’ अहवालात मिळवलेले यश सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. २०२२-२३ मध्ये जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्थानावर आणि भारतात ६५ व्या स्थानावर होता. मिशन उत्कर्ष अभियानामुळे गुणवत्तावाढीसह शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये सुधारणा झाली. जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान प्राप्त झाले, हा सर्वात मोठा सन्मान आहे.
डॉ. राजेंद्र भोई, वरिष्ठ अधिव्याख्याता (डाएट), कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT