दिलीप भिसे
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलांतर्गत आर्थिक गुन्हे म्हणजे आर्थिक मायाजाल, दामदुप्पट परताव्यांच्या आमिषाने गोरगरिबांच्या तिजोरीवर दरोडे टाकून संपत्तीच्या राशी रचणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडून संबंधितांच्या मालमत्तांवर टाच आणणारा विभाग. जिल्ह्यात 300 ते 350 कोटींच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश झाला आहे. कंपन्यांच्या म्होरक्यांसह 250 सराईतांना कोठडीत डांबून घोटाळेबाजांना जेरीला आणणाऱ्या पथकाला जुजबी मनुष्यबळामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एका अधिकाऱ्यासह केवळ 7 कर्मचाऱ्यांवर शाखेचा डोलारा आहे. परिणामी अत्यल्प मनुष्यबळामुळे क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शहर व जिल्ह्यात अलीकडच्या काळात सुमारे पन्नासहून अधिक बोगस कंपन्यांमधील आर्थिक व्यवहाराचा भांडाफोड झाला आहे. त्यापैकी बहुतांशी गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू आहे. आजवर ए. एस. ट्रेडर्स (40 कोटी), वेल्थ शेअर (30 कोटी), सहकारी बँक अपहार ( 9.47 कोटी), जमीन फसवणूक (11 कोटी), क्रिप्टो करन्सी (13.92 कोटी), मेकर ॲग््राो (26 कोटी), कापड व्यवहार (2.67 कोटी), क्रिप्टो करन्सी, इचलकरंजी (12.38 कोटी) अशा एक ना अनेक गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे अन्वेषणमार्फत तपास सुरू आहे.
अडीचशेवर घोटाळेबाजांना कोठडीची हवा...
आर्थिक घोटाळ्याचे बहुतांशी गुन्हे क्लिष्ट, गुंतागुंतीचे असतानाही आर्थिक शाखेने 300 ते 350 कोटींच्या गुन्ह्यांचा छडा लावून 250 घोटाळेबाजांना कोठडीत डांबले आहे. केवळ उपअधीक्षक व निरीक्षक दजाचे प्रत्येकी एक आणि केवळ सात पोलिसांवर आर्थिक शाखेचा कारभार सुरू आहे.